‘कागर’ मधून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणारा तरुण अभिनेता शुभंकर तावडे सध्या भारावून गेलाय. तो सध्या वेब सिरीज आणि चित्रपटांमधून काम करीत आहे आणि त्याचा अनोखे नाव असलेला आगामी चित्रपट ‘८ दोन ७५’ सध्या प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. याच चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या प्रेमामुळे तो प्रचंड खूष आहे. या चित्रपटासाठी शुभंकर ला उत्तम अभिनयासाठी चार वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत सर्वोत्तम अभिनयासाठी पुरस्कार मिळाले आहेत.
अभिनेता शुभंकर तावडे एक उत्तम अभिनेता आहे. हे त्याने आपल्या वेगवेगळ्या कलाकृतींनी सिध्द केले आहेच. ‘८ दोन ७५’ मधील अभिनयासाठी इंडो फ्रेंच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ठ अभिनेता, ड्रुक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ठ अभिनेता, गंगटोक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ठ अभिनेता आणि बिरसामुंडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ठ सहायक अभिनेता अशा चार फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कारांनी त्याचा गौरव झाला आहे.
अभिनेता सुनिल तावडे यांचा सुपुत्र असलेल्या शुभंकरच्या रक्तातच अभिनय आहे. त्यामुळेच तर आपल्या पदार्पणातल्या कागर सिनेमातच त्याने सर्वोत्कृष्ठ कामगिरी करून फिल्मफेअर पुरस्कार पटकावला होता. आता ‘८ दोन ७५’ फिल्ममधल्या त्याच्या कामगिरीचाही प्रत्येक फिल्म फेस्टिवलमध्ये विशेष उल्लेख केला गेला आहे. ही नक्कीच त्याच्यासाठी अभिमानाची बाब आहे.