''माझ्याकडून जर चूक घडली असेल तर मी ज्येष्ठ अभिनेत्री पूजा पवार यांची माफी मागायला तयार आहे," असे अभिनेता शशांक केतकर याने सांगितलं होतं. याबाबत गेले काही दिवस आधी महेश टिळेकर आणि आज स्वतः पूजा पवार यांनी एका व्हिडिओद्वारे आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगितल्यानंतर शशांकने या व्हिडीओखाली कमेंट करून आपला माफीनामा सादर केला आहे.
दरम्यान पूजा पवार यांनी शशांक केतकरचा आपल्याला फोन आल्याची माहिती फेसबुकवरुन दिली आहे. त्यांनी शशांकला याप्रकरणी माफ केल्याची पोस्ट फेसबुकवर पोस्ट केली आहे.
सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिझम म्हणजेच घराणेशाहीवर चर्चा सुरू झाली. त्यानंतर अशी घराणेशाही मराठीमध्ये आहे की नाही? याकडे ती आपसूकच वळली. याचवेळी निर्माते दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून आपलं मत मांडताना एक नवीनच मुद्दा समोर आणला, तो म्हणजे नवोदित मराठी कलाकार इतर ज्येष्ठ कलाकारांना साधी सन्मानाची वागणूक देत नाहीत. आपल्या दाव्याचं स्पष्टीकरण देताना त्यांनी ज्येष्ठ अभिनेत्री पूजा पवार यांच्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगितला. पूजा पवार आणि शशांक केतकर यांनी महेश कोठारे प्रोडक्शनची 'फिरुनी नवी जन्मेन मी' या मालिकेत आई-मुलाची भूमिका साकारली होती. त्यानंतर कित्येक वर्षांनी त्या शशांकची मुख्य भूमिका असलेलं 'कुसुम मनोहर लेले' हे नाटक पाहण्यासाठी गेल्या. अभिनेत्री पल्लवी पवार ही या नाटकात मुख्य भूमिकेत होती. तिला भेटल्यावर साहजिक त्या शशांककडे वळल्या. मात्र त्यांना पाहूनही त्यांची साधी दखलदेखील न घेता शशांक तेथून निघून गेला.
होही वाचा - सुशांत सिंहचा अंतिम शवविच्छेदन अहवाल आला समोर; जाणून घ्या काय आहे मृत्यूचे कारण...
या घटनेचा त्यांना प्रचंड धक्का बसला. आपल्यासोबत काम केलेला कलाकार आपल्यासोबत अस का वागला? हा विचार करत त्या निघून गेल्या. त्यानंतर आज पुन्हा पूजा पवार स्वतः काही निमित्ताने फेसबुकवर लाईव्ह आल्या, तेव्हा नेटिझन्सनी टिळेकर यांनी सांगितलेला किस्सा खरा आहे का..? अशी विचारणा त्यांच्याकडे केली. यावर हो अस घडलं होतं आणि त्यांचं आपल्याला फार दुःख झाल्याचं त्यांनी मान्य केलं. जर मराठी इंडस्ट्रीतील सुलोचनादीदी यांच्यासारख्या ज्येष्ठ कलाकार, सार्वजनिक कार्यक्रमात सगळ्यांची एवढ्या आपुलकीने चौकशी करतात, तर मग नवोदित कलावंतांना दोन शब्द बोलण्यात नक्की अडचण काय आहे..? अशी विचारणा त्यांनी या व्हिडिओद्वारे केली.
या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. अखेरीस ज्याची चर्चा या व्हिडिओमध्ये झाली होती, त्या शशांकने त्या व्हिडिओची दखल घेऊन याबाबत आपली बाजू मांडली, ''नमस्कार. सगळ्यात आधी, माझ्याकडून असं काही घडलं असेल तर मी मनापासून माफी मागतो. मी वयानी आणि अनुभवांनी लहान आहे आणि याची मला पूर्ण कल्पना आहे. पूजा ताई नाटकाला आली होती आणि आम्ही बोललो होतो, असं मला तरी आठवतंय. असो... रिस्पेक्टबद्दल बोलायचं झालं तर मी माझ्या लहानपणापासून प्रत्येकाचाच आदर करत आलो आहे. इरेस्पेक्टीव्ह ऑफ वय आणि अनुभव. जे मला पर्सनली ओळखतात ते माझ्या अपरोक्ष सुद्धा हे नक्कीच सांगू शकतील की, मी असा नाही. माझ्या नाटकाला आलेला प्रत्येक प्रेक्षक हे सांगू शकेल की, प्रयोग संपल्यावर, अगदी शेवटचा प्रेक्षक भेटून बाहेर पडल्याशिवाय मी कधीच थिएटरमधून बाहेर पडत नाही. माझ्या आई-बाबांकडून, शिक्षकांकडून, आजू बाजूच्या सगळ्याच कलाकारांकडून मी कायमच आदर आणि प्रामाणिकपणा शिकत आलो आहे. मी ताईला पर्सनली फोन सुद्धा करेन, तिच्याशी बोलेन. यापेक्षा अधिक कुणालाही कुठलच स्पष्टीकरण द्यावं असं मला वाटतं नाही. कॉमेंट्स करणाऱ्या सर्वांना एक विनंती आहे, पर्सनली तुम्ही एखाद्याला ओळखत नसाल, तर नुसत्या ऐकलेल्या गोष्टींवरून त्या माणसाचे संस्कार, त्याचा पैसा, त्याची लायकी, त्याची प्रगती, त्याची अधोगती याविषयी अधिकृतपणे बोलून त्याविषयी निर्णय देऊन मोकळे होऊ नका. मला आता हा विषय वाढवायचा नाहीये. मी माझी प्रामाणिक प्रतिक्रिया देणं हे माझं मी कर्तव्य समजतो, जे मी पार पाडले आहे." असे शशांक केतकरने म्हटले आहे.
पोस्टप्रमाणे शशांक याने पूजा यांना भेटून प्रत्यक्ष माफी मागावी, असा सल्ला देखील अनेक नेटिझन्सनी दिला आहे. मात्र, झालेल्या चुकीबद्दल त्याने माफी मागितल्याने अखेर मराठी इंडस्ट्रीत घडलेला हा मानापमान नाट्याचा अंक सोशल मीडियावर सरू होऊन सोशल मीडियावरच संपला, असं समजायला काही हरकत नाही.