मुंबई- प्रसिद्ध चित्रपट निर्माता-अभिनेता राज कपूर यांचा मुलगा अभिनेता-दिग्दर्शक राजीव कपूर यांचे मंगळवारी निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू कपूर यांनी या बातमीला दुजोरा दिला होता. दरम्यान त्यांचे पार्थिव चेंबूर येथील इनल्याक रुग्णालयातून घरी नेण्यात आले. यावेळी राजीव यांचे थोरले बंधू रणधीर कपूर रुग्णालयात हजर होते. अॅम्ब्यूलन्समधून पार्थिव नेण्यात आले.
राजीव कपूर यांच्या पार्थिवावर सायंकाळी सात वाजता चेंबूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. या अंत्यविधीसाठी २० कुटुंब सदस्य उपस्थितीत होते.
राजीव कपूर यांनी १९८३ मध्ये एक जान हैं हम या चित्रपटातून पदार्पण केले होते. परंतु राम तेरी गंगा मैली या १९८५ मध्ये सुपरहिट ठरलेल्या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यांनी आसमान, लव्हर बॉय, जबरदस्त आणि हम तो चले परदेस यासारख्या चित्रपटात भूमिका केल्या.