‘इंडस्ट्रीत माझा कोणी बाप असेल तर ते रवी सर आहेत’ : प्रथमेश परब! - नोकरी करणार होता प्रथमेश
‘बालक पालक’ नंतर मला चरित्र भूमिका मिळतील असे वाटले होते, पण मी रवी सरांचा आजन्म ऋणी राहीन की त्यांनी मला ‘टाइम पास’ मधून थेट ‘हिरो’ कॅटेगरीत बसवलं. इंडस्ट्रीत माझा कोणी बाप असेल तर ते रवी सर आहेत, असे प्रथमेश परबने ईटीव्हीला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितले.
![‘इंडस्ट्रीत माझा कोणी बाप असेल तर ते रवी सर आहेत’ : प्रथमेश परब! Prathamesh Parab](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10555209-281-10555209-1612854194702.jpg)
मुंबई - प्रथमेश परब अभिनित ‘टकाटक’ ने गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. “खरंतर ‘टकाटक’ ही ॲडल्ट कॉमेडी होती व आम्ही सर्वच थोडे साशंक होतो की या चित्रपटाला प्रेक्षक-पाठिंबा मिळेल की नाही म्हणून. मनोरंजनसृष्टीतल्या अनेकांनी मला हा सिनेमा करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांचा विचार माझ्या भल्याचाच होता पण अशाप्रकारच्या विषयाला मराठी प्रेक्षक थारा देत नाहीत असे त्यांचे म्हणणे होते. मी आणि आमच्या टीमचा टार्गेट ऑडियन्स होता तरुण प्रेक्षकवर्ग. त्यांचा तर पाठिंबा मिळालाच परंतु अगदी साठीपलीकडील प्रेक्षकांनाही हा चित्रपट मनोरंजित करून गेला. खरंच खूप छान वाटलं की आपण घेतलेली रिस्क फळली म्हणून. मराठी चित्रपट ‘कन्टेन्ट’ साठी ओळखला जातो आणि ‘टकाटक’ मध्ये ’कन्टेन्ट’ नसता तर प्रेक्षकांनी तो धुडकावून लावला असता. माझ्या मते मराठी प्रेक्षक मोठ्या मनाचा झालाय हे खरं”, प्रथमेश परब सांगत होता ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांच्याशी गप्पा मारताना. ‘टकाटक’ ला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर त्याचा सिक्वेल अपेक्षितच आहे परंतु त्यापलीकडे काहीही सांगण्यास प्रथमेशने हसत हसत नकार दिला.
‘ओह माय घोस्ट’ कडून खूप अपेक्षा
प्रथमेश परबची मुख्य भूमिका असलेला एक हॉरर-कॉमेडी चित्रपट येऊ घातलाय ज्याचे नाव आहे ‘ओएमजी’ म्हणजे ‘ओह माय गॉड’ नव्हे तर ‘ओह माय घोस्ट’. “जेव्हा मला हा चित्रपट ऑफर झाला तेव्हा मलासुद्धा वाटले होते की ओएमजी’ म्हणजे ‘ओह माय गॉड’ असणार. कदाचित हा सिक्वेल वगैरे असेल असे वाटले परंतु ‘ओएमजी’ म्हणजे ‘ओह माय घोस्ट’ आहे असे कळल्यावर माझा त्यातील इंटरेस्ट अधिकच वाढला. ही एका जग्गू नामक अनाथ युवकाची कथा आहे. जीवनात आपण काहीच मिळवू शकलो नाही, अशा हताश मनःस्थितीत असताना त्याला स्वप्नात भूते दिसू लागतात. जग्गूला स्वतःचे आयुष्य आधीच ओझे वाटत असताना आता त्याला या भूताखेतांच्या विश्वाला सामोरे जावे लागते. या भूतांच्या माऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी तो अनेक क्लृप्त्या करतो आणि हे करत असताना त्याला जीवनातील इतर अंगांचा साक्षात्कार होतो. त्याचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो आणि नवीन पहाट त्यांच्या जीवनात येते. अशी ही गोड कहाणी आहे या चित्रपटाची”, प्रथमेशने विस्ताराने सांगितले. “खरंतर ‘हॉरर’ जॉनर चे चित्रपट मराठीत फारसे बनत नाहीत म्हणून मला याची कथा आवडली होती. आता हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय व लॉकडाऊन नंतर रिलीज होतोय त्यामुळे मला ‘ओह माय घोस्ट’ कडून खूप अपेक्षा आहेत”, प्रथमेश पुढे म्हणाला.