हैदराबाद - दक्षिण चित्रपट उद्योगाचे प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज अलिकडेच अपघात ग्रस्त झाले होते. त्यानंतर हैदराबादला ते शस्त्रक्रियेसाठी पोहोचले होते. ही माहिती त्यांनी ट्विट करुन चाहत्यांना कळवली होती. आता त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून सुखरुप असल्याचे कळवले आहे. त्यानी पोस्ट केलेल्या फोटोत डाव्या खांद्यावर शस्त्रक्रियेनंतर पट्टी बांधलेली दिसते.
प्रकाश राज यांनी शेअर केलेल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''डेविल इज बॅक, शस्त्रक्रिया यशस्वी झाली ...प्रिय मित्र डॉक्टर गुरुवर रेड्डी यांचे आभार. माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे आभार...लवकरच कामावर परतेन."
प्रकाश राज यांनी 10 ऑगस्ट रोजी एका ट्विटमध्ये अपघाताची माहिती दिली होती आणि सांगितले होते की अपघातात लहान फ्रॅक्चर झाले आहे आणि त्यांचे मित्र डॉ गुरुवर रेड्डी यांच्याकडे शस्त्रक्रियेसाठी हैदराबादला घेऊन जात आहेत.
'एक लहानसा अपघात...एक लहानसे फ्रॅक्चर... डॉ. गुरु रेड्डी यांच्या हातून सुरक्षित हाताने शस्त्रक्रिया व्हावी यासाठी हैदराबादला उड्डाण करीत आहे. मी बरा आहे काळजी नसावी...', अशा आशयाचे ट्विट प्रकाश राज यांनी केले होते.