मुंबई - अभिनेता नसिरुद्दीन शाह यांचा आज ६९ वा वाढदिवस साजरा होत आहे. भारतातील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी ते एक समजले जातात. समांतर चित्रपटासोबतच व्यावसायिक चित्रपट आणि रंगभूमीवरील त्यांचा वावर अतिशय दमदार आहे. त्यांनी आजवर केलेल्या प्रतिभावान भूमिकांमुळे भारत सरकारने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
नसिरुद्दीन शाह यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बाराबंकी शहरात झाला. त्यांनी केलेल्या भारदस्त भूमिकांमुळे त्यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव झाला आहे. यात तीन राष्ट्रीय पुरस्कार, तीन फिल्मफेअर पुरस्कार तसेच व्हेनीस फिल्म फेस्टीव्हलसह अनेक पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत.
नसिरुद्दीन शाह चित्रपटांच्या दोन्ही प्रवाहावर हुकुमत गाजवणारे अभिनेता म्हणून ओळखले जातात. समांतर तित्रपटात त्यांचे नाव सर्वोत्तम कलाकारांच्यामध्ये घेतले जाते, तर व्यावसायिक चित्रपटात त्यांनी मिळवलेले यश उत्तुंग आहे.
चित्रपटाच्या मुख्य प्रवाहात त्यांनी १९८० मध्ये 'हम पांच' या चित्रपटातून सुरुवात केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाई करु शकला नाही, मात्र त्यातीलल नसिरुद्दीन यांचे काम लक्ष वेधणारे होते. त्यानंतर भारताचा ऑल टाईम हिट कॉमेडी चित्रपट 'जाने भी दो यारों'मध्ये त्यांची रवि वासवानींसोबतची केमेस्ट्री अफलातून होती. दोघांची जबरदस्त कॉमिक टायमिंग प्रेक्षकांना भावली. त्यांच्या स्टेटसला मजबूत केले १९८६ मध्ये आलेल्या सुभाष घई यांच्या 'कर्मा'ने. दिलीप कुमार, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केले.
त्यांचे पुरस्कार प्राप्त चित्रपटांमध्ये 'ए वेन्सडे', 'क्रिश','चक्र', 'आक्रोश', 'बाजार', 'मासूम', 'स्पर्श', 'मोहरा', 'चाहत', 'इश्किया', 'राजनीति', 'सात खून माफ' , 'डर्टी पिक्चर', ‘मिर्च मसाला’, ‘अलबर्ट पिंटों को गुस्सा क्यों आता है’, ‘मंडी’, ‘मोहन जोशी हाज़िर हो’, ‘अर्द्ध सत्य’, ‘कथा’,‘कर्मा’, ‘इजाज़त’, ‘जलवा’, ‘हीरो हीरालाल’, ‘गुलामी’, ‘त्रिदेव’, ‘विश्वात्मा’, “राजनिती”,“जिंदगी ना मिलेगी दुबारा” अशा असंख्य चित्रपटांचा समावेश आहे.