बॉलिवूड सुपरस्टार विद्या बालन सोबत रोमँटिक भूमिका करणारा एकमेव मराठी अभिनेता म्हणजे मंगेश देसाई. मंगेश ने मा. भगवान दादा यांचा बायोपिक ‘एक अलबेला’ या मराठी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका केली होती आणि विद्या बालनने अभिनेत्री गीता बाली हिची. आलंय माझ्या राशीला, भारत माझा देश आहे, लव्ह सुलभ, वाजवूया बँड बाजा, रश्मी रॉकेट, मंकी बात सारख्या मराठी-हिंदी चित्रपटांतून झळकलेल्या मंगेश देसाईने नवीन इंनिंग्स सुरु केली आहे. मंगेश आता निर्माता बनला असून त्याच्या पहिल्या वाहिल्या चित्रपटाचे कामही सुरु झाले आहे.
अभिनेता मंगेश देसाईचं आता निर्माता म्हणून पदार्पण झाले असून त्याने साहिल मोशन नावाची निर्मितीसंस्था स्थापिली आहे. रंगभूमी, चित्रपट आणि टीव्ही मालिका या तीनही माध्यमांमध्ये सशक्त अभिनेता म्हणून मंगेश देसाईनं आपलं स्थान निर्माण केलं आहे. मात्र इतकी वर्षं अभिनय केल्यानंतर मंगेश देसाई आता वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. अनेक संवेदनशील चित्रपट, आणि क्राईम पेट्रोलसह विविध मालिकांमध्ये मंगेशनं अभिनेता म्हणून आपला ठसा उमटवला आहे. विनोदी अभिनेता म्हणून तर त्याची ओळख आहेच. अभिनेता म्हणून असलेल्या ओळखीच्या पलीकडे जाऊन मंगेशनं निर्माता म्हणून एक चित्रपट हाती घेतला आहे. अतिशय महत्त्वाकांक्षी असा हा चित्रपट आहे. ठाण्यात या चित्रपटासाठी झालेल्या निवड चाचणीला इतकी गर्दी झाली की तीन सभागृह घेऊन निवड चाचणीचं आयोजन करावं लागलं.