नंदुरबार- शहादा येथे पुरुषोत्तम पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सिने अभिनेता मकरंद अनासपुरे यांना या पुरस्काराचे मानकरी म्हणून सन्मानित करण्यात आले. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शहादा येथील पी. के. अण्णा पाटील फाउंडेशनच्या वतीने पुरुषोत्तम पुरस्कारांचे वितरण दीपक पाटील यांच्या हस्ते झाले. येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या सरदार पटेल सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात संस्था स्तरावर नाम फाउंडेशन पुणे, या संस्थेचे मकरंद अनासपुरे व व्यक्तिगत स्तरावर ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांना 'पुरुषोत्तम पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. यावेळी फाउंडेशन तर्फे रोख एक लाख रुपये, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक पाटील, संस्थेच्या मानद सचिव कमलताई पाटील, आमदार राजेश पाडवी, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, अखिल भारतीय गुर्जर महासभेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष गोपीचंद गुर्जर ,राष्ट्रीय महिला अध्यक्ष रेणू चौधरी इत्यादी मान्यवर हजर होते.
नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे म्हणाले की, नाम फाउंडेशन म्हणजे माणसाने माणसासाठी सुरू केलेली माणुसकीची चळवळ आहे. त्यातूनच नामचा जन्म झाला. विचार ही गोष्ट माणसाला घडवते किंवा बिघडते. मराठवाड्यातील समस्या उग्र होत असताना नामच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला. विदर्भ मराठवाड्याच्या दुष्काळाची भयानक परिस्थिती पाहून आम्ही हादरलो आणि नामची स्थापना झाली. दुर्गम भागात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पुढाकार नाम तर्फे घेण्यात आला. एकमेकांचा हात धरून सुरू केलेली ही लोक चळवळ आहे. जयनगर (ता. शहादा) येथे पाण्याचे भरीव काम नामतर्फे करण्यात आले. संस्थेत वाद नको म्हणून राजकारण विरहित काम सुरू आहे. पुरुषोत्तम पुरस्काराचा विनियोग चांगल्या कामासाठी झाला पाहिजे. त्यासाठी पुरस्काराची रक्कम चिंचोरा गावात सुरू असलेल्या पाण्याच्या कामाला प्रदान करीत असल्याचे मकरंद अनासपुरे यांनी जाहीर केले.