मुंबई -सध्या देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत. काही ठिकाणी या कायद्याच्या विरोधात आंदोलनही होत आहेत. आता अभिनेते जावेद जाफरी यांनीदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून या कायद्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
'श्रद्धांजली' असं शिर्षक देऊन त्यांनी काव्यपंक्तीच्या माध्यमातून बोचरी टीका केली आहे.
'इस्लामी नाम, नमाजी बाप,
खुदा का ताब, जो कर ना सका....
एक कागज के पुर्जे ने वो काम कर दिया, एक आम हिंदुस्तानी को मुसलमान कर दिया', अशा काव्यपंक्ती त्यांनी शेअर केल्या आहेत. यामध्ये त्यांनी अप्रत्यक्षरित्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध दर्शवला आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटीझन्सच्याही प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा -नागरिकता संशोधन कायदा आर्टिकल 14 चे उल्लंघन आहे, बॉलिवूड दिग्दर्शकाने केले ट्विट
काय आहे नागरिकत्व सुधारणा कायदा?
या विधेयकानुसार पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही. तसेच त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक २०१९ मध्ये आहे. यात फक्त मुस्लिमांना वगळण्यात आले आहे.
या सुधारित कायद्यामुळे सीमेपलीकडील पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणीस्तानातील बिगर मुस्लीम नागरिकांना भारताचं नागरिकत्व मिळवणं सुलभ होणार आहे. त्यामुळे ईशान्य भारतातील राज्यांमध्ये या विधेयकाला लोकांचा मोठा विरोध आहे.