मुंबई -दमदार अभिनय, भरदार शरीरयष्टी आणि जबरदस्त अॅक्शन स्टंट या त्रिसूत्रीच्या जोरावर अभिनेता अंकित मोहनने 'फर्जंद' चित्रपटातून सर्वांची मने जिंकली होती. आता पुन्हा एकदा आगामी 'फत्तेशिकस्त' या चित्रपटातून अंकितच्या अभिनयाची आणि अॅक्शनची हीच जादू अनुभवयाला मिळणार आहे. शिवकाळातील शूर आणि विश्वासू सरदारांपैकी एक असणाऱ्या 'येसाजी कंक' ही महत्त्वाची भूमिका साकारण्यासाठी अंकितने चांगलीच कंबर कसली आहे.
'येसाजी कंक' यांना ‘शिवबाचा ढाण्या वाघ’ म्हणून ओळखलं जातं. मदमस्त हत्तीलाही आपल्या शौर्याने काही क्षणांत लोळवणाऱ्या येसाजी कंक यांचे स्वराज्यनिर्मितीत बहुमूल्य योगदान राहिले असल्याची महती इतिहासात वर्णलेली आहे.
हेही वाचा -'मन उधाण वारा' चित्रपटात दिसणार ही नवी जोडी
अंकितला अॅक्शनची प्रचंड आवड असल्याने चित्रपटातील अॅक्शन्स सीन स्वत: करण्यासाठी अंकित आग्रही होता. यातील एका सीनसाठी तर अंकितने चक्क दुसऱ्या मजल्यावरून उडी मारत तो सीन पूर्ण केला. त्याचा हा धाडसी शॉटस बघून सगळेजण थक्क झाले.
आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना अंकित म्हणाला, 'कोंडाजी फर्जंद'च्या यशानंतर 'येसाजी कंक' यांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी नक्कीच आनंददायी आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न मी केला आहे. माझा हा प्रयत्न प्रेक्षकांनाही आवडेल', असा विश्वास अंकित व्यक्त करतो.
हेही वाचा -पाहा, अभिनेत्री रेखा अन् त्यांच्या बहिणींचा गोतावळा
ए.ए फिल्म्सचे सहकार्य व आलमंड्स क्रिएशन्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. अजय आरेकर व अनिरुद्ध आरेकर या चित्रपटाचे निर्माते आहेत. छायांकन रेशमी सरकार तर संकलन प्रमोद कहार यांचे आहे. संगीत-पार्श्वसंगीत देवदत्त मनिषा बाजी तर गीते संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, वि.स खांडेकर, दिग्पाल लांजेकर यांची आहेत. वेशभूषा पौर्णिमा ओक यांची असून रंगभूषा सानिका गाडगीळ यांची आहे. कार्यकारी निर्माता उत्कर्ष जाधव आहेत.
१५ नोव्हेंबरला ‘फत्तेशिकस्त’ प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -शूटर आणि रिव्हॉल्वर आज्जीच्या 'सांड की आँख'चा ट्रेलर अखेर प्रदर्शित