मुंबई -स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतीकारक भगत सिंग यांची आज ११२ वी जयंती आहे. २८ सप्टेंबर १९०७ साली त्यांचा जन्म झाला होता. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. मात्र, त्यांनी ब्रिटिशांविरोधातील दिलेला लढा अजरामर ठरला. त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घडामोडी चित्रपटातूनही पडद्यावर मांडण्यात आल्या. त्यांच्या जीवनावर आत्तापर्यंत ७ चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. या सातही चित्रपट भगत सिंग यांनी देशासाठी दिलेलं अमुल्य योगदान पाहायला मिळतं.
शहीद - ए - आझाद भगत सिंग (१९५४)
भगत सिंग यांच्या जीवनावर तयार झालेला हा पहिला चित्रपट होता. जगदीश गौतमा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. यामध्ये प्रेम अबिद, जयराज, स्मृती विश्वास आणि अशिता मुजुमदार यांनी भूमिका साकारल्या होत्या. भगत सिंग यांच्या मृत्यूनंतर २३ वर्षांनी हा चित्रपट तयार झाला होता. यामधील 'सर्फरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है', हे गाणं तुफान हिट झालं होतं. मोहम्मद रफींनी हे गाणं गायलं होतं. आजही प्रत्येक राष्ट्रीय दिवसाच्या पर्वावर हे गाणं ऐकायला मिळतं.
शहीद भगत सिंग (१९६३)
साधारणत: एका दशकानंतर हा चित्रपट तयार करण्यात आला होता. यामध्ये शम्मी कपूर यांनी भगत सिंग यांची भूमिका साकारली होती. शकिला, प्रेमनाथ आणि अचला सचदेव यांच्याही या चित्रपटात मुख्य भूमिका पाहायला मिळाल्या. के. एन. बंसल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.
शहीद (१८६५)
'शहीद भगत सिंग' या चित्रपटानंतर अवघ्या दोनच वर्षामध्ये पुन्हा एकदा भगत सिंग यांच्या जीवनावर आधारित 'शहीद' चित्रपट प्रदर्शित झाला. अभिनेते मनोज कुमार यांनी यामध्ये भगत सिंग यांची भूमिका साकारली होती. यामध्ये प्रेम चोप्रा, अनंत पुरुषोत्तम, प्राण, निरूपा रॉय यांच्यासह इतरही कलाकार झळकले होते. भारतीय सिनेसृष्टीतील एक उत्कृष्ट क्लासिक सिनेमा म्हणून आजही हा चित्रपट ओळखला जात आहे.