हल्ली चित्रपटसृष्टीत एक नवीन ट्रेंड सुरु झालाय तो म्हणजे गाजलेल्या, नावाजलेल्या चित्रपटांचा वर्धापनदिन साजरा करण्याचा. अलीकडेच अनेक चित्रपटांच्या ‘ऍनिव्हर्सरीज’ साजऱ्या होताना सर्वांनी बघितलंच असेल. तर ‘लगान’ या चित्रपटाला नुकतीच २० वर्ष पूर्ण झाली आणि त्याची २०वी ऍनिव्हर्सरी थाटामाटात साजरी झाली. वीस वर्षांपूर्वी आमिर खानचा प्रसिद्ध आणि संस्मरणीय क्रीडापट 'लगान' प्रदर्शित झाला होता, ज्याने मुख्य प्रवाहातील हिंदी सिनेमाचा चेहरामोहरा बदलण्यास मदत केली. ए.आर. रहमान यांचे अफलातून संगीत या चित्रपटाची खासियत होती आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा विस्तृत कॅनवास आणि आमिर खान आणि इतर सर्व कलाकारांनी केलेल्या दमदार अभिनयाने हा चित्रपट सजला होता. परंतु चित्रपट बनविताना अनेक चांगल्या-वाईट गोष्टी घडत असतात ज्या प्रेक्षकांसमोर येत नाहीत. ‘लगान’ संदर्भात अशाच अज्ञात गोष्टींवर टाकलेली ही नजर.
‘लगान’ च्या बहुतांश ऑडिशन मुंबईतील आमिर खानच्या घरीच झाल्या होत्या.
१९९८ साली दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर टेलिव्हिजन सिरीयल ‘सीआयडी’ मध्ये काम करीत आणि तिथेच ते ‘लगान’ च्या स्क्रिप्टवर पण काम करीत. अभिनेता यशपाल शर्मा त्यांच्या त्या मालिकेत सहकलाकार होता आणि त्याचे काम आवडल्यामुळे त्यांनी त्याला ‘लगान’ मध्ये महत्वाची भूमिका दिली होती.
‘लगान’ च्या शूटदरम्यान प्रत्येक कलाकार एकमेकांना चित्रपटातील व्यक्तिरेखेच्या नावानेच संबोधित असे. कथेशी आणि त्यातील पात्रांशी संबंधित असलेल्या भावनेला प्रेरित करण्यासाठी सेटवर हा एक ‘रुल’ होता.
शूटिंग दरम्यान शिस्तबद्धता आणि एकसूत्रता राखण्यासाठी सर्वांच्या सर्व, मग त्या दिवशी त्याचे शूट असो वा नसो, ठेवण्यासाठी, कलाकारांना पहाटे ५ वाजता सेटवर रिपोर्ट करणे अनिवार्य होते. तसेच उशीर झाला तर त्या कलाकाराला हॉटेलवरच सोडण्यात येईल (हॉटेलपासून लोकेशन जवळपास चाळीसेक की.मी. लांब होते) असा दमही भरला गेल्याने सर्व कलाकार ४.३० वा. बसमध्ये बसून सेटवर पोहोचत.
‘लगान’ मध्ये सर्वात जास्त ब्रिटिश कलाकार होते आणि तो एक रेकॉर्ड आहे. तसेच लंडनमधील नावाजलेले अभिनेत्री रॅशेल शेली जिने एलिझाबेथ साकारली आणि कॅप्टन रसेलच्या भूमिकेतील ब्रिटिश अभिनेता पॉल ब्लॅकथॉर्न यांच्यासाठी हिंदी शिक्षकाची नेमणूक करण्यात आली होती आणि ही प्रक्रिया तब्बल ६ महिने सुरु होती.
‘लगान’ मधील पीडित, रापलेले गावकरी वाटण्यासाठी गोरेगोमटे आमिर खान आणि राज झुत्सी (या दोघांनी ‘जो जिता वोही सिकंदर’ या चित्रपटात एकत्र काम केले होते) ‘सन-बाथ’ घ्यायचे जेणेकरून त्यांची त्वचा करड्या रंगाची दिसेल.
‘बार बार हां, बोलो यार हां, या 'चले चलो' गाण्याच्या शूटिंग दरम्यान, आमिरने घोषणा करीत सांगितले की चित्रपटाच्या सेटवर छत्री किंवा पदवी नसणार आणि प्रत्येक व्यक्तिरेखा पडद्यावर अस्सल दिसण्यासाठी ५० डिग्री तापमानात सर्वांनी शूटिंग करायचे आहे. आमिर खान स्वतः सर्वांसोबत त्या कडक उन्हात उभा होता आणि ग्रेसी सिंग जी चित्रपटाची हिरॉईन होती तिलाही यातून सूट देण्यात आली नव्हती.