मुंबई -सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मची क्रेझ वाढत आहे. नवनविन वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. डिजीटल प्लॅटफॉर्मवरील प्रेक्षकांनाही नवीन कंटेट पाहायला आवडतो. नवनवीन आणि धाडसी प्रयोग इथे अगदी सहज स्वीकारले जातात. म्हणूनच आजच्या तरुण दिग्दर्शकाची पावलं या माध्यमाकडे वळायला लागली आहेत. हिंदीप्रमाणेच मराठी वेब विश्व देखील आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. मराठी वेब विश्वात 'भाडीपा'ने आपलं स्थान निर्माण केलं आहे. आता 'भाडीपा'च्या एम एक्स प्लेअरवर एक नाही तर दोन वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
'पांडू' आणि 'वन्स अ इयर' असे या वेबसीरिजचे नाव आहेत. या दोन्हीही वेबसीरिजचे विषय हटके आहेत.
यातली पहिली वेबसिरीज आहे अनुशा नंदा कुमार आणि सारंग साठे दिग्दर्शित 'पांडू'. पांडू हा शब्द पोलिसांसाठी उपहासात्मक रित्या अनेकदा वापरला जातो. पण, याच पांडूच्या वर्दीमागे दडलेला सर्वसामान्य माणूस दाखवण्याचा प्रयत्न पांडू या वेबसिरीजद्वारे करण्यात आला आहे. पोलिसांचं काम, त्यातला ताण आणि त्यांच्या जगण्याचे पैलू हे इन्स्पेक्टर आणि हवालदार यांच्यातल्या मैत्रीच्या गोष्टीतून मांडण्याचा प्रयत्न या वेबसिरीजमधून करण्यात आला आहे.
या वेबसिरीजच वैशिष्ट्य म्हणजे अभिनेते दीपक शिर्के हे या वेबसिरीजद्वारे पहिल्यादा नव्या माध्यमात काम करताना दिसणार आहेत. तर त्याच्यासोबत अभिनेता सुहास शिरसाठ, तृप्ती खामकर स्वतः सारंग हे देखील यात काम करताना दिसतील. नुसता लाच घेणारा किंवा कामाच्या बोज्यात अडकलेला पोलीस न दाखवता त्याच्या आयुष्यात घडणारे कडू गोड प्रसंग नर्म विनोदी पद्धतीने या वेब सिरीजमधून मांडण्यात येणार आहेत.