महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

निर्मात्यांना भुरळ घालणारे कथानक ‘देवदास’...आणि बरंच काही! - शाहरुखच्या 'देवदास' चित्रपटाला 19 वर्षे

सरतचंद्र चट्टोपाध्याय यांची ‘देवदास’ ही शोकांतिका १९१७ मध्ये प्रकाशित झाली होती. देवदास मधील पात्रे अस्सल वाटल्यामुळे अनेक फिल्ममेकर्सना या कादंबरीने भुरळ घातली. या चित्रपटावर हिंदीत प्रामुख्याने तीन, त्याच नावाचे, चित्रपट बनले. संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘देवदास’ नुकताच १९ वर्षांचा झाला. त्याच्या १९व्या वाढदिवशी संजय लीला भन्साली, शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि माधुरी दीक्षित यांनी नुकत्याच निधन झालेल्या ‘देवदास’ म्हणजेच दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

19-years-to-bhansalis-devdas-
‘देवदास’...आणि बरंच काही!

By

Published : Jul 13, 2021, 5:52 PM IST

सध्या चित्रपटसृष्टीत जुन्या चित्रपटांचे वर्धापन दिन साजरे करण्याची फॅशन आलीय. अगदी तीन-चार वर्षांपासून तो चाळीस-पन्नास वर्षांपर्यंत हे वर्धापनदिन साजरे केले जातात. सोशल मीडियाची पोच सर्वदूर पोहोचली असल्यामुळे त्या माध्यमातून सिनेमासंदर्भातील व्यक्ती एकमेकांना शुभसंदेश पाठवत असतात आणि लोकांनाही आपल्या आनंदात सामील करून घेत असतात. १२ जुलै ला संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘देवदास’ ला १९ वर्षे पूर्ण झाली आणि साहजिकच समाज माध्यमांवर अभिनंदनाचा पाऊस पडला कारण यातील तीन मुख्य कलाकार होते, शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि माधुरी दीक्षित (नेने).

भन्साळी यांच्या 'देवदास' चित्रपटाला 19 वर्षे,

सरतचंद्र चट्टोपाध्याय लिखीत देवदास कादंबरी

सरतचंद्र चट्टोपाध्याय यांची ‘देवदास’ ही शोकांतिका १९१७ मध्ये प्रकाशित झाली होती. देवदास हा बंगाल मधील एका परगण्यात श्रीमंत घराण्यातील मुलगा आणि एका सामान्य घरातील मुलगी पार्वती म्हणजेच पारो यांची लहानपणापासूनच दोस्ती असते. तो काही वर्षांसाठी उच्च शिक्षणासाठी कलकत्याला (आताचे कोलकाता) जातो. परत आल्यावर वयात आलेली आणि अतिशय सुंदर दिसणाऱ्या पारोला पाहून तो हरखून जातो व तिच्यावर प्रेम करू लागतो. पारो त्याच्यावरच प्रेम करत असते आणि त्याच्यासोबतच्या सुखी संसाराची स्वप्ने बघत असते. परंतु त्यांच्यातील सामाजिक आणि आर्थिक दुरींमुळे त्यांची ताटातूट करण्यात येते. पारोचे लग्न एका विधुराशी लावून देण्यात येते आणि त्या धक्क्याने देवदास दारूच्या आहारी जातो. रोज तिच्या आठवणीत सकाळ संध्याकाळ फक्त दारू पित राहतो. खूप प्रयत्न करूनही त्याची दारूची लत सुटत नाही. पारोच्या आठवणींतून देवदास ला बाहेर काढण्यासाठी त्याचा मित्र चुन्नी बाबू एके दिवशी त्याला एका कोठ्यावर घेऊन जातो जेथील एक नायकीण चंद्रमुखी खूप सुंदर असते तसेच तिच्या अप्रतिम नृत्याची ख्याती सर्वदूरपर्यंत पसरलेली असते. देवदास ला भेटल्यावर त्याची अवस्था आणि त्याचे पारोवरील निस्सीम प्रेम पाहून तिचे मन त्याच्यावर जडते आणि चंद्रमुखी देवदास च्या एकतर्फी प्रेमात पडते. पुढे देवदासची अवस्था बिकट होते आणि अनेक नाट्यमय प्रसंगानंतर तो इहलोक सोडून निघून जातो.

भन्साळी यांच्या 'देवदास' चित्रपटाला 19 वर्षे,

अनेक चित्रपट निर्मात्यांना भुरळ घालणारे कथानक

देवदास मधील पात्रे अस्सल वाटल्यामुळे अनेक फिल्ममेकर्सना या कादंबरीने भुरळ घातली. या चित्रपटावर हिंदीत प्रामुख्याने तीन, त्याच नावाचे, चित्रपट बनले. पहिला ‘देवदास’ बनला होता १९२८ साली, मूकपटांच्या जमान्यात. यात फणी बर्मा, तारकबाला आणि पारूलबाला यांच्या प्रमुख भूमिका होत्या व याचे दिग्दर्शन केले होते नरेश मित्रा यांनी. दुसरा देवदास जास्त फेमस झाला कारण त्यात ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार ने देवदास रंगविला होता. त्यावेळी अशी आख्यायिका होती की चित्रपटाच्या शेवटाला दिलीप कुमार (म्हणजे तो रंगवीत असणारे पात्र) मरण पावल्यावर सिनेमा हीट होतो. १९५५ साली जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा दिलीप कुमार खूप मोठा स्टार होता आणि ‘देवदास’ ने त्याच्या प्रसिद्धीला चार चांद लावले. त्यातील पारोची भूमिका सुचित्रा सेन ने तर चंद्रमुखी ची भूमिका वैजयंतीमाला ने साकारली होती.

भन्साळी यांच्या 'देवदास' चित्रपटाला 19 वर्षे,

भन्साळींचा देवदास

भव्य दिव्य चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या संजय लीला भन्साली यांनी तिसरा ‘देवदास’ २००२ साली बनविला होता. यात शाहरुख खान ने देवदास ची भूमिका केली होती आणि ती खूप गाजली पण होती. थोडक्यात शाहरुख ‘अभिनय’ करू शकतो यावर शिक्कामोर्तब झाले होते. त्याच्यासोबत दोन अत्यंत सुंदर अभिनेत्री होत्या त्या म्हणजे पारो च्या भूमिकेत ऐश्वर्या राय बच्चन आणि चंद्रमुखीच्या भूमिकेत होती माधुरी दीक्षित. शाहरुख-ऐश्वर्या-माधुरी या त्रिकुटाच्या स्टारडम आणि अभिनयामुळे हा ‘देवदास’ सुपर-डुपर हीट झाला होता.

भन्साळी यांच्या 'देवदास' चित्रपटाला 19 वर्षे,

‘देवदास’ ची आधुनिक रूपे

‘देवदास’ बद्दल अजूनही बरंच काही आहे. या तीन हिंदी देवदास चित्रपटांव्यतिरिक्तही प्रादेशिक भाषांमध्ये ‘देवदास’ आपली छाप सोडून गेला. बंगाली मध्ये १९३५ साली बनलेल्या ‘देवदास’ चे दिग्दर्शन केले होते प्रोमोतोष बरुआ यांनी तर २०१३ साली चाशी निजरुल इस्लाम यांनी बंगालीत अजून एक देवदास बनविला होता. हिंदीत अजून एक ‘देवदास’ बनला १९३६ साली, ज्याचे दिग्दर्शन केले होते प्रोमोतोष बरुआ यांनी आणि मुख्य भूमिकेत के एक सैगल होते. तसेच पारोची भूमिका केली होती जमुना बरुआ यांनी तर चंद्रमुखी रंगविली होती अभिनेत्री राजकुमारी हिने. प्रादेशिक भाषांत म्हणायचं तर १९३७ साली आसामी, १९५३ साली तेलगू आणि तामिळ, १९८९ मल्याळम तर २०१० मध्ये उर्दू भाषेत ‘देवदास’ बनला होता. तसेच सुप्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक शक्ती सामंता यांनी २००२ साली बंगालीत ‘देवदास’ निर्माण केला होता ज्यात प्रसनजीत चॅटर्जी, अर्पिता चॅटर्जी आणि इंद्राणी हलदार यांनी अनुक्रमे देवदास, पारू आणि चंद्रमुखीच्या भूमिका साकारल्या होत्या.

भन्साळी यांच्या 'देवदास' चित्रपटाला 19 वर्षे,

याबरोबरच देवदास ला आधुनिक टच देऊन सिनेमे व वेब सिरीजसुद्धा बनविण्यात आलीय. अनुराग कश्यप ने अभय देओल ला घेऊन मॉडर्न देवदास बनविला ‘देव डी’ या नावाने. तसेच सुधीर मिश्रा यांचा ‘दास देव’ हा चित्रपट आणि एकता कपूरने ‘देव डी डी’ नावाने बनविलेली वेब सिरीज, ज्याचे दिग्दर्शन केले होते केन घोष यांनी, हे ‘देवदास’ चे आधुनिक रूप होते. याहीपुढे ‘देवदास’ दिग्दर्शकांना भुरळ घालतंच राहणार.

भन्साळी यांच्या 'देवदास' चित्रपटाला 19 वर्षे,

दिलीप कुमारना श्रध्दांजली

संजय लीला भन्साली दिग्दर्शित ‘देवदास’ नुकताच १९ वर्षांचा झाला. त्याच्या १९व्या वाढदिवशी संजय लीला भन्साली, शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि माधुरी दीक्षित यांनी नुकत्याच निधन झालेल्या ‘देवदास’ म्हणजेच दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहत लिहिले की, “#देवदास प्रमाणेच तुमची स्मृतीही स्मरणात राहील... कायमची”.

हेही वाचा - आमिर खानवर भडकले 'लदाख'चे गावकरी, ‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात

ABOUT THE AUTHOR

...view details