मुंबई - भारतीय महिला हॉकी टीमची प्रेरणादायक गोष्ट सांगणाऱ्या 'चक दे इंडिया' या चित्रपटाला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. किंग खान शाहरुख आणि त्याच्यासोबत भूमिका साकारणाऱ्या १० ही मुलींची भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. अतिशय प्रेरणादायी कथानक असलेला हा चित्रपट आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करतो.
हा चित्रपट का पाहावा याची बरीच कारणं आहेत. मात्र, शाहरुखने साकारलेल्या 'कबिर खान' या पात्राकडून मात्र, बरंच काही शिकण्यासारखं आहे.
परिस्थितीचा सामना करणं -
शाहरुखने साकारलेल्या 'कबीर खान'वर त्याची कोणतीही चूक नसताना 'देशद्रोही'चा आरोप लागलेला असतो. हा आरोप खोडून काढण्यासाठी तो काहीही करण्यासाठी तयार असतो. जेव्हा त्याला भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकाची संधी मिळते, तेव्हा तो त्याच्यावर लागलेला कलंक विसरुन नव्या जोमाने भारतीय संघासाठी प्रयत्न करतो. त्यामुळे परिस्थितीचा सामना करणं हा धडा त्याच्याकडून शिकायला मिळतो.
ताकद हिच एकता -
सुरुवातीला वेगवेगळ्या भागातून आलेल्या महिला एकमेकींशी जुळवून घेत नाहीत. मात्र, जेव्हा त्या एकत्र येऊन संघासाठी खेळतात, तेव्हा खरी एकता पाहायला मिळते.
महिला सशक्तीकरण -
चित्रपटात भारतीय महिला खेळांडूंबद्दल कोणालाही फारशी अपेक्षा नसल्याचं दाखवण्यात आलं आहे. महिलांच्या संघाला कोण प्रशिक्षण देणार, अशीही मानसिकता यामध्ये पाहायला मिळते. मात्र, 'कबीर खान' हा महिला सशक्तीकरणाला प्राधान्य देत त्यांना प्रशिक्षण देतो.
अहंकार बाजूला ठेवा -
एकमेकांशी स्पर्धा करताना नकळत आपल्या मनात गर्वाचे घर तयार होत असते. मात्र, जेव्हा आपण एकत्र येऊन संघासाठी लढत असतो, तेव्हा आपल्यातला अहंकार बाजूला ठेवून एकमेकांसाठी लढता आलं पाहीजे, हा धडा देखील या चित्रपटातून मिळतो.