हैदराबाद- काम आणि लोकप्रियता या दोन्ही बाबतीत 2021 हे वर्ष बॉलिवूड स्टार्ससाठी खास राहिलेले नाही. कोरोनामुळे यावर्षी शुटिंगचे काम संथगतीने सुरू असतानाच काही स्टार्स कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. यासोबतच काही स्टार्सना आजारपणाचाही त्रास सहन करावा लागला. एकंदरीत २०२१ हे वर्ष चित्रपट कलाकारांसाठी फारसे लाभदायी ठरले नाही. २०२१ मध्ये कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या ऐश्वर्या रायपासून ते शिल्पा शेट्टीपर्यंतच्या बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल आपण बोलणार आहोत.
ताज्या प्रकरणात, पनामा पेपर्स लीक प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिला समन्स बजावले आहे. ईडीने ऐश्वर्याला चौकशीसाठी बोलावले आहे. ऐश्वर्या सोमवारी ईडीसमोर हजर होण्याची शक्यता आहे. पनामा पेपर्समध्ये देश-विदेशातील अशा अनेक राजकारण्यांची आणि अभिनेत्यांची नावे समोर आली होती, ज्यांची परदेशात खाती असल्याचा आरोप आहे. या यादीत अमिताभ बच्चन यांच्या नावाचाही समावेश आहे, त्यांच्यावर किमान चार शिपिंग कंपन्यांमध्ये संचालक असल्याचा आरोप आहे.
बॉलिवूडमधील आणखी एक अलीकडील प्रकरण म्हणजे जॅकलिन फर्नांडिसवर मनी लाँड्रिंग संबंधित झालेला आरोप. जॅकलिनवर सुकेश चंद्रशेखरकडून महागड्या भेटवस्तू आणि कार घेतल्याचा आरोप आहे. त्याने 200 कोटींची फसवणूक केली होती. त्याचवेळी जॅकलिनने या आरोपाचा इन्कार केला आहे. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने अभिनेत्रीची अनेकदा चौकशीही केली आहे. सुकेशने आपल्या नुकत्याच दिलेल्या स्टेटमेंटमध्ये जॅकलिनला 1.80 लाख डॉलर दिल्याचे सांगितले आहे.