मुंबई - अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि इरफान खान यांच्याबरोबर थ्रोबॅक फोटोग्राफ्सचे कोलाज शेअर केले आणि तुलनेत जेव्हा एखादा तरुण सेलिब्रिटी गमावला तर जास्त वेदना का होतात, असे लिहिले आहे.
ऋषी आणि इरफान या दोघांसोबत काम करणाऱ्या बिग बी यांनी दोन महान कलाकार गमवल्याबद्दल इन्स्टाग्रामवर लिहिले आहे. एका ज्येष्ठ सेलेब्रिटीचा मत्यू आणि एका तरुण सेलेब्रिटीचा मृत्यू.. तरुणाच्या मृत्यूहून ज्येष्ठाच्या जाण्याचे दुःख कमी असते का ? असा सवाल अमिताभ यांनी केलाय.
ऋषी कपूर यांच्या हसऱ्या चेहऱ्यावरचा त्रास पाहायचा नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात कधीच भेटलो नाही, असेही बच्चन यांनी पुढे लिहिलंय.
बिग बी आणि ऋषी यांनी अमर अकबर अँथनी, नसीब, कभी कभी सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. अलिकडेच त्यांनी '१०२ नॉट आउट'मध्येही काम केले.
अमिताभ बच्चन यांनी २०१५ मध्ये पिकू या चित्रपटात इरफान खानसोबत काम केले होते. दीपिका पदुकोणचीही यात प्रमुख भूमिका होती. बुधवारी इरफान यांचे निधन झाले. यावेळी अमिताभ यांनी लिहिले होते, “इरफान खान यांचे निधन झाल्याची बातमी नुकतीच मिळाली आणि हे सर्वात त्रासदायक आहे. दुःखद बातमी ... एक अतुलनीय प्रतिभा ... एक कृपाळू सहकारी, सिनेमा जगासाठी एक महत्त्वपूर्ण योगदानकर्ता. लवकरच आम्हाला सोडून गेला. एक प्रचंड पोकळी तयार झाली आहे. प्रार्थना आणि दुआ. "
दरम्यान, इरफानची पत्नी सुतापा व मुले बाबिल आणि अयान यांनी डॉक्टर व चाहत्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. आता वर्षानुवर्षे त्यांनी शिकवलेल्या गोष्टी जीवनात लागू करण्यास ते शिकतील, असा विश्वास परिवाराने इरफान यांच्या जाण्यानंतर व्यक्त केलाय.