मुंबई- अभिनेत्री कंगना रणौतची आज वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये चौकशी होणार आहे. यासाठी ती व तिची बहिण रंगोली चंदेल हजर झाल्या आहेत. आपली होत असलेली पोलीस चौकशी हा मानसिक, भावनिक आणि शारीरिक छळाचा एक भाग असल्याचे कंगनाने ट्विटरवर म्हटले आहे. मला या देशाकडून उत्तरे हवी आहेत. मी तुमच्या हितासाठी उभी राहिलेली आहे आता तुम्ही माझ्यासाठी उभे राहा असे आवाहन तिने ट्विटरवर केले आहे. आज दुपारी १२ वाजून १४ मिनीटांनी तिने एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.
या व्हिडिओमध्ये कंगना म्हणते, नमस्ते, ''जेव्हा मी देश हिताची गोष्ट बोलते, ज्या प्रकारे माझ्यावर अत्याचार केला जात आहे, माझे शोषण केले जात आहे, ते सर्व देश पाहात आहे. बेकायदेशीरपणे माझे घर पाडण्यात आले, शेतकरी हिताच्या बाबतीत मी बोलल्यानंतर माझ्यावर असंख्ये केसेस दाखल केल्या जात आहे. इतके की मी हसले म्हणूनही माझ्यावर केस दाखल झाली आहे. माझी बहिण रंगोलीने कोरोनाच्या सुरुवातीला डॉक्टरांवर झालेल्या अत्याचाराच्या विरुध्द आवाज उठवला होता, तिच्यावरही केस झाली. त्यात माझेही नाव घालण्यात आले, तेव्हा तर मी ट्विटरवर नव्हते. असं होत नाही पण आपल्या चीफ जस्टीसनी हे केस रिजेक्ट केली आणि म्हटले की या केसला काही अर्थ नाही.''