मुंबई -आज या घडीला सोशल मीडियावर हॅशटॅग रणवीर सिंगसह विकी कौशिक हा ट्रेंड खूप जोरात सुरू आहे. त्यानंतर विकी कौशिक कोण आहे? यावर भरपूर चर्चा झडत आहेत. ट्विटर युजर्स या विकी कौशिकवरुन भरपूर मजा घेत आहेत. कंगना रनौतने एक ट्विट केल्यानंतर हा ट्रेंड वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.
आज अभिनेत्री कंगना रनौतने तिच्या नेहमीच्या सवयीने एक ट्विटरवर पोस्ट लिहिली. यात ती काही बॉलिवूड कलाकारांची ड्रग टेस्ट केली पाहिजे, अशी मागणी तिने केली आहे. विशेष म्हणजे हे ट्विट तिने पीएमओ इंडियाला टॅग केले आहे.
कंगनाने लिहिलेले ट्विट असे आहे, "मी रणवीर सिंग, अयान मुखर्जी, विकी कौशिक यांना ड्रगची चाचणी करण्यासाठी रक्ताचे सँपल्स देण्याची विनंती करते. ते कोकेनचे व्यसनी असल्याची अफवा आहे. त्यांनी ही अफवा खोडून काढावी असे मला वाटते. त्यांच्या क्लिन सँपल्समधून लाखो लोकांना हे तरुण प्रेरणादायी ठरु शकतात."
यामध्ये तिने लिहिलेले विकी कौशिक हे नाव परिचित नाही. तिला कदाचित विकी कौशल असे म्हणायचे असेल. परंतु यामुळे विकीच्या चाहत्यांसह कंगना विरोधी युजर्सनी यावर रान उठवायला सुरूवात केली आहे. अक्षरशः हजारो प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झालाय आणि यावरील चर्चा वाढत चालली आहे.
"सामान्य लोक विकी कौशिक असेच वाचतील, ज्यांनी ड्रगचा मोठा डोस घेतलाय ते विकी कौशल असे वाचतील," असे एका युजरने म्हटलंय.