मुंबई: सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर, नेपोटिझ्म या विषयावर चर्चेला उधाण आले आहे. सुशांतचे चाहते बॉलिवूडमधील अनेक दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. या चर्चेत सहभागी होत निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी प्रत्येक नवीन कलाकार मोठ्या प्रॉडक्शन हाऊसची योग्य अयोग्यता कशी शोधतात यावर चर्चा केली. सुशांतसिंह राजपूतने यशराज फिल्म्सचा 'शुध्द देसी रोमान्स' चित्रपट करायचा असल्यामुळे 'हसी तो फसी' हा चित्रपट नाकारला होता याबद्दल मोकळेपणाने सांगितले.
"मुकेश छाबरा माझ्या ऑफिस मध्ये काम करायचा. आम्ही 'फॅन्टम' या निर्मिती संस्थेकडून 'हसी तो फसी' हा चित्रपट बनवत होतो. त्या चित्रपटाची सुरुवात आम्ही सुशांतसिंहला घेऊन केली होती. त्यानंतर आम्ही परिणीती चोप्राकडे गेलो. आम्ही सांगितले हा 'काइ पो छे' चित्रपटातील हा कलाकार आहे त्याचा 'पीके' हा चित्रपट येतोय. त्यानंतर तो यशराज फिल्मसकडे गेला, त्यावेळी परिणीतीला यशराज फिल्म्स हाताळत होती. त्यानंतर यशराज फिल्म्सने सुशांतला बोलवले आणि त्याला 'शुध्द देसी रोमान्स'साठी करारबध्द केले", असे अनुरागने सांगितले.
तो पुढे म्हणाला, "सुशांत माझ्या ऑफिसमध्ये बसायचा, मी आणि मुकेश त्याच्याशी बोलायचो. त्याने यशराज फिल्म्सशी साईन केले आणि हसी तो फसी हा आऊटसायडरचा चित्रपट सोडला. कारण त्याला यशराज फिल्म्सची मान्यता मिळवायची होती, हे सर्व कलाकारांच्या बाबतीत होते आणि मी कोणालाही अडवू शकत नव्हतो. तो अतिशय हुशार कलाकार होता. हे सर्व तुमच्या निवडीबद्दल आहे. मी करीत असलेल्या चित्रपटापेक्षा त्याने जास्त पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्याने हा पुढे जाण्याचा निर्णय घेतला कारण त्याला धर्मा प्रॉडक्शनसोबत काम करायचे होते. लोक आता कोणाचा तरी मृत्यूचा वापर प्रत्येकाला खाली खेचण्यासाठी करीत आहेत."