नांदेड - अभिनेता आशुतोष भाकरे याने आपल्या नांदेड येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकारामुळे शहरात आणि मराठी मनोरंजन जगतात खळबळ उडाली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या कारणांचा शोध नांदेड पोलीस घेत आहेत.
आशुतोष हा मनोरंजन क्षेत्रातला स्ट्रगलर अभिनेता होता. त्याने यापूर्वी 'इच्चार करा पक्का' या चित्रपटात भरत जाधवचा सहकलाकार म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची समस्या सांगणाऱ्या 'भाकरी' या मराठी चित्रपटात नायकाची भूमिका केली होती. हळूहळू आशुतोष दिग्दर्शन क्षेत्राकडेही वळला होता. आशुतोषची पत्नी मयुरी देशमुख ही 'खुलता कळी खुलेना' या टीव्ही सिरियलची माध्यमातून घराघरात पोहोचली. पुढे तिने काही नाटकांत देखील कामे केली आहेत. मयुरीने 'डिअर आजो' या नाटकात संजय मोनेंसोबत काम केले आहे. विशेष म्हणजे हे गाजलेले नाटक तिनेच लिहिले आहे.
मयुरी आणि आशुतोष दोघेही मुंबईत राहात होते. गेल्या महिन्यात ते नांदेडला परतले होते. आणि अचानक आशुतोषने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाचा तपास नांदेड पोलीस करीत आहेत. आत्महत्येचा निर्णय त्याने का घेतला असावा याच्या नेमक्या कारणांचा शोध पोलीस घेत आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिली आहे.