मुंबई : अभिनेत्री राधिका आपटेला वाटतं की, घराणेशाहीची चर्चा फक्त चित्रपटसृष्टीशी संबंधित नाही. तथापि, या चर्चेत आपल्याला स्वारस्य नसल्याचे तिने म्हटले आहे.
सध्या चालू असलेल्या नेपोटिझम चर्चेबद्दल विचारले असता ती म्हणाली, "मला खरोखरच या चर्चेचा भाग व्हायचे नाही."
"हे फक्त इनसायडर आणि आऊटसायडर व्यक्तींबद्दल नाही. ही एक मोठ्या वादाची चर्चा आहे. याचे फक्त एक उत्तर असू शकत नाही. एक समाज म्हणून आपण घराणेशाहीला पाठिंबा देत असतो आणि हे फक्त फिल्मइंडस्ट्री पुरते मर्यादित नाही. या सर्व गोष्टी बदलायच्या असतील तर, आपण याकडे कसे पाहतोय, यात आपल्यालाबदल करणे गरजेचे आहे." असे ती म्हणाली.
बॉलिवूडमध्ये नाव कमावणे किती कठीण आहे, याबद्दल राधिका म्हणाली, "मला वाटतं आऊटसायडर आणि इनसायडर या दोन्हींसाठीही यश मिळवणे जिकरीचे आहे. एखाद्या फॅमिलीत जन्म घेतला म्हणून यश मिळत नसते. याचे उत्तर क्लिष्ट आहे. याचे उत्तर देणे सोपे नाही, असे मला वाटते.''
"मी येथे प्रसिद्धीसाठी आलेले नाही. कधीकधी मी जास्त मानधन घेत असेन, परंतु यश आणि अपयशाला मी गांभीर्याने घेत नाही," असे राधिकाने वृत्तसंस्थेला सांगितले.
२००५मध्ये प्रदर्शित झालेल्या लाइफ हो तो ऐसी !, या चित्रपटातून तिने फिल्मसृष्टीत प्रवेश केला होता. त्यानंतर तिने शोर इन द सिटी, कबाली, फोबिया, बदलापूर, मांझी : द माउंटन मॅन, लस्ट स्टोरीज, सेक्रेड गेम्स, पॅड मॅन आणि घोल या चित्रपटातून आणि वेब सिरीजमधून काम केले आहे.