अभिनेता ह्रतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांची भूमिका असलेला वॉर चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजिंक्य ठरला आहे. या सिनेमाने बॉलिवूडचे असंख्य विक्रम मोडीत काढले आहेत. पहिल्या विकेंडला १६६ कोटींची कमाई करणारा बॉलिवूडचा हा पहिला चित्रपट ठरलाय. सलमान खानच्या भारत चित्रपटाने १५० कोटींची कमाई पहिल्या आठवाड्या अखेर करत विक्रम केला होता.
वॉर आणि भारत चित्रपटाला मोठा विकेंड मिळाला होता. हे दोन्ही चित्रपट बुधवारी रिलीज झाले. त्यामुळे बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा ५ दिवसांचा विकेंडचा लाभ चित्रपटांना झाला. यापूर्वी कलंक या चित्रपटालाही ५ दिवसांचा लाभ मिळाला होता. मात्र कमाई ६६ कोटींची होती.
२०१९ मध्ये मोठ्या विकेंडचा लाभ उठवणारे चित्रपट पुढील प्रमाणे आहेत.
वॉर - १६६.२५ कोटी / बुधवार ते रविवार
भारत - १५०.१० कोटी / बुधवार ते रविवार
मिशन मंगल - ९७.५६ कोटी / गुरुवार ते रविवार
केसरी - ७८.०७ कोटी / गुरुवार ते रविवार
गल्ली बॉय - ७२.८५ कोटी / गुरुवार ते रविवार
कलंक - ६६.०३ कोटी / बुधवार ते रविवार
वॉर चित्रपटाने अनेक विक्रम या अगोदरही बनवले होते. त्यामध्ये रिलीजच्या पहिल्याच दिवशी तब्बल ५३. ३५ कोटींची कमाई चित्रपटाने करत आजपर्यंतचे कमाईचे सर्व विक्रम मागे टाकले आहेत. हा चित्रपट हिंदीसह तेलुगु आणि तामिळ भाषेतही रिलीज करण्यात आला आहे.
ह्रतिक आणि टायगर या दोघांचाही सर्वाधिक कमाईचा हा पहिलाच चित्रपट ठरलाय. अमिताभ आणि आमिरच्या 'ठग्ज ऑफ हिंदुस्थान'ने पहिल्याच दिवशी ५२. २५ कोटींची कमाई करत विक्रम केला होता. मात्र, हा चित्रपट प्रेक्षकांनी नाकारला होता. वॉर चित्रपटाला मात्र प्रेक्षकांनी स्वीकारल्याचे चित्र देशभर पाहायला मिळाले. वॉर चित्रपटाने हिंदीत ५१.६० कोटींची कमाई केली. तर तामिळ आणि तेलुगुमध्ये चित्रपटाने १. ७५ कोटींची कमाई केली. भारतात एकूण ५३. ३५ कोटींची कमाई केल्याने बॉलिवूडचा हा सर्वाधिक कमाई पहिल्या दिवशी करणार चित्रपट ठरला आहे.