भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी भारताच्या कोविड -१९ मदतकार्यासाठी मोहीम जाहीर केली. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये कोहली आणि अनुष्काने भारतातील कोविड-१९ च्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्यांनी मदतकार्यासाठी निधी उभा करण्याबद्दल त्याने आखलेल्या नियोजनाचा तपशील शेअर केला आहे. या जोडप्याने निधीला दोन कोटी रुपये दिले आहेत. ''कोविड -१९ चे संक्रमण भारतात सुरू झाल्यापासून आपला देश कठीण काळातून जात आहे. आपल्या आरोग्य यंत्रणेला आव्हान दिले जात आहे. आपल्याला एकत्र येऊन आपल्या भारताला मदत करण्याची गरज आहे,'' असे कोहली यांनी एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे.
"अनुष्का आणि मी केट्टोवर निधी जमा करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. तुमच्या सहकार्यांची गरज आहे. लोोकांचे जीव वाचवण्यासाठी कोणतीही रक्कम कमी असत नाही." पुढे त्याने लिहिलंय. आपल्या चाहत्यांना कोविड विरुध्दच्या लढाईत सहभागी होण्याचे आवाहन विराट आणि अनुष्काने केले आहे.
"बदल घडवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, परंतु या संघर्षासाठी आम्हाला मदतीची आवश्यकता आहे. मी आपणा सर्वांना आमच्या चळवळीत सामील होण्याची विनंती करतो. आपला देश सुरक्षित व मजबूत ठेवण्यासाठी आपण आपली भूमिका बजावूया. धन्यवाद. लिंक वर क्लिक करा.", असे कोहलीने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे.
यापूर्वी अनुष्काने सोशल मीडियावर स्वतंत्र पोस्टमध्ये जाहीर केले होते की कोविड -१९ विरुद्ध देशातील लढाईत ती आणि तिचा नवरा विराट कोहली "चळवळ" सुरू करीत आहेत.