मुंबई- सारा अली खान आणि कार्तिक आर्यन लवकरच एका आगामी चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. मात्र, चित्रपटाच्या शीर्षकाविषयीची अद्याप घोषणा झालेली नाही. या चित्रपटाच्या निमित्तानं साराची कार्तिकसोबत स्क्रीन शेअर करण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. चित्रपटाच्या सेटवरील सारासोबतचा एक फोटो कार्तिकने काही दिवसांपूर्वीच शेअर केला होता.
आता यापाठोपाठ या दोघांचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सारा आणि कार्तिक दोघेही मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत. कॅमेऱ्यासमोर सारा कार्तिकला मोठ्याने हाक देत आहे. तर कार्तिक तिला ओरडण्यापासून थांबवत आहे. त्यांचा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही, हे नक्की.
याआधीही सारा आणि कार्तिकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये सारा कार्तिकसोबत बाईकवर फिरताना दिसत होती. आता या जोडीला एकत्र पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. इम्तियाज अली यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट २०२० मध्ये १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.