हैदराबाद - विजय सेतुपती हे तमिळ चित्रपटातील एक मोठे नाव. आमिर खानच्या आगामी 'लालसिंग चढ्ढा' चित्रपटात विजय काम करणार अशा बातम्या झळकल्या होत्या. आमिर आणि विजय सेतुपती हे दोन दिग्गज कलाकार पडद्यावर एकत्र येणार असल्यामुळे चाहतेही सुखावले होते. मात्र तसे घडू शकले नाही.
लालसिंग चढ्ढा चित्रपटात काम करण्यासाठी विजय सेतुपतीने होकार दिला होता. या चित्रपटासाठी वजन कमी करण्यास सांगितले गेले यामुळे त्याला चित्रपट सोडावा लागला का? असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला, ''मी शरीराने आणि मनाने खूप आरामात आहे. मी ज्या प्रोजेक्टमध्ये जातो, ते माझ्यासोबत येतात.''
जेव्हा चित्रपटाशी त्याच्या संबंधाबद्दल विचारणा केल्यावर विजय म्हणाला, "आमिर सरांनी मला व्यक्तिशः या भूमिकेची ऑफर दिली. तामिळनाडूत जिथे माझे शूटिंग सुरू होते तिथे मला स्क्रिप्ट ऐकवण्यासाठी आमिर सर आले होते. त्यांच्यासोबत दिग्दर्शक अद्वैत चंदन येऊ शकले नव्हते. आमिर सरांनी मला कथा सांगितली आणि त्या गावात त्यांनी रात्री मुक्काम केला. इतका मोठा सुपरस्टार असूनही कोणतीही हवा नाही. ते एक अद्भूत कथाकथनकार आहेत. त्यांनी ज्या प्रकारे कथा सांगितली ते ऐकताना मी मंत्रमुग्ध झालो होते आणि मी लगेचच होकार दिला."