मुंबई- शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेला 'कबीर सिंग' चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. अनेकांनी तर कित्यकेदा सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिला. मात्र, एक व्यक्ती अशी आहे ज्याला शाहिदचा कबीर सिंग पाहायचा नाही.
या कलाकाराचं नाव ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, कारण ही व्यक्ती इतर कोणीही नसून विजय देवरकोंडा आहे. 'कबीर सिंग हा चित्रपट विजय देवरकोंडाच्या 'अर्जून रेड्डी' या दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. विजय सध्या आपल्या आगामी डिअर कॉम्रेड चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून यादरम्यानच त्याने आपण कबीर सिंग पाहणार नसल्याचं सांगितलं आहे.
यामागचं कारणही विजयनं स्पष्ट केलं आहे. मी ओरिजनल चित्रपटात काम केलं आहे आणि मला चित्रपटाची कथाही माहिती आहे, मग मी हा चित्रपट का पाहू? असा सवाल विजयने केला आहे. माझ्याजागी या रिमेकमध्ये शाहिदने ते पात्र साकारले आहे. त्यामुळे, माझ्यासाठी त्यात नवीन असं काहीच नसल्याचं विजयने म्हटलं आहे. 'कबीर सिंग'चं दिग्दर्शनही 'अर्जून रेड्डी'चे दिग्दर्शक संदीप वंगा रेड्डी यांनीच केलं असल्यानं चित्रपट हीट व्हावा, अशी माझी इच्छा होती. मात्र, हा चित्रपट तर सुपरहिट ठरला, असं विजय यावेळी म्हणाला.
दरम्यान 'कबीर सिंग'नं बॉक्स ऑफिसवर अनेक नवे विक्रम रचले आहे. या सिनेमानं केवळ भारतातच नव्हे तर विदेशातील प्रेक्षकांचीही मने जिंकली. कबीर सिंगने आतापर्यंत २५९.९४ कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला चार आठवडे होऊनही सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवत आहे. विशेष म्हणजे ओरिजनल 'अर्जून रेड्डी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केलेल्या कलेक्शनचा आकडा 'कबीर सिंग'नं अवघ्या तीन दिवसातच पार केला होता.