मुंबई- अभिनेता विद्युत जामवाल याचा गेल्या वर्षी ओटीटीवर रिलीज झालेल्या चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. त्याचवेळी निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सीक्वेलची घोषणा केली होती. आता या चित्रपटाच्या शुटिंगचा मुहूर्त करण्यात आला आहे.
समिक्षक तरण आदर्श यांनी ही माहिती आपल्या सोशल मीडियावरुन दिली आहे. ''विद्युत जामवलाचा 'खुदा हाफीज भाग 2' चे शुटिंग सुरू झाले आहे. या दुसऱ्या भागाच्या शीर्षकात 'अग्निपरीक्षा' हा शब्द जोडण्यात आला आहे. विद्युतसह शिवालिका ओबेरॉय हिची मुख्य भूमिका असेल. याचे मुंबईत शुटिंग सुरू झाले. फारुक कबीर यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचे निर्माते कुमार मंगात पाठक आमि अभिषेक पाठक आहेत.'',असे तरण आदर्श यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
'खुदा हाफिज चॅप्टर -२' या चित्रपटाचा सिक्वेल मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्याची योजना आहे. याबद्दल बोलताना विद्युत म्हणाला होता, "त्याने (मुख्य पात्र समीर) बायकोला परत मिळवणे चित्रपटाचा योग्य अंत नाही. इतका गोंधळ झाल्यानंतर समाजात यशस्वीरित्या जगणाऱ्या स्त्रीच्या (नर्गिसची व्यक्तिरेखा शिवलिका ओबेरॉय) प्रेमकथेची ही खरी सुरुवात आहे. दुसऱ्या अध्यायात, आम्ही तेच दाखवण्याची योजना आखली आहे. "सत्य घटनेवर आधारित 'खुदा हाफिज' चित्रपटात नवविवाहित समीर (विद्युत) आणि नर्गिस (शिवलिका ओबेरॉय) या जोडप्याची कहाणी आहे.चांगल्या संधीच्या शोधात परदेशात काम करण्याचा निर्णय घेतात, जिथे नर्गिस हरवते.