मुंबई - मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि किरण राव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांचा डान्स करीत असतानाचा एक व्हिडिओ सध्या खूप गाजतोय. 'लाल सिंग चढ्ढा' या चित्रपटाच्या शुटिंगसाठी लदाखमध्ये गेलेल्या आमिर आणि किरणला या व्हिडिओत स्थानिक कलाकारांसोबत एन्जॉय करताना तुम्ही पाहू शकाल.
आमिर आणि किरण रावचा हा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल झालाय. आमिर खानच्या फॅनने हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय की, '' 'लाल सिंग चढ्ढा'चे शुटिंग सुरू आहे. शुटिंगच्या जागेवर येऊन स्थानिक गावकरी त्यांना शुभेच्छा देत असतानाचा डान्स.''
आमिर खान आणि किरण राव यांनी अलिकडेच घटस्फोट घेत असल्याचे एकमताने जाहीर केले होते. आझाद या त्यांच्या मुलाचे पालक म्हणून दोघेही जबाबदारीने संगोपन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. चित्रपट निर्मिती, पानी फाऊंडेशन आणि इतर उपक्रमात ते एकत्र काम करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर काही दिवसातच 'लाल सिंग चढ्ढा'चे शुटिंग लदाखमध्ये सुरू झाले. या सिनेमाच्या सेटवर किरण राव आमिर सोबत हजर होती. दोघांचा अभिनेता नागा चैतन्यासोबतचा फोटोही व्हायरल झाला होता. त्या पार्श्वभूमीवर दोघांचा हा व्हिडिओ आला आहे.
आमिर आणि किरण राव हे विभक्त झाले असल्यामुळे त्यांचे चाहते नाराज झाले होते. 15 वर्षाच्या त्यांच्या सुखी संसारला दृष्ट लागल्याची नाराजी चाहत्यांनी व्यक्तही केली होती. मात्र ही बातमी आमिर आणि किरण यांनी हसत मुखाने दिली होती. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर स्पष्ट दिसते की दोघेही अत्यंत आनंदाने स्थानिकांच्यासोबत नाचताना दिसत आहेत.
हेही वाचा - सनी लिओन झाली 'मुंबईकर' : पती आणि तीन मुलांसह केला गृहप्रवेश