मुंबई- पद्मभूषण पुरस्कार विजेते प्रसिद्ध संगीतकार मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी यांचे निधन झाले आहे. ते ९२ वर्षाचे होते. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांना काही दिवसांपूर्वीच सुजय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. आज याच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
खय्याम यांना १९७७ मध्ये ‘कभी कभी’ आणि १९८२ मध्ये ‘उमराव जान’मधील संगीतासाठी फिल्मफेअर पुरस्काराने, २००७ साली संगीत नाटक अकादमी पुरस्काराने आणि २०११ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. २०१० मध्ये फिल्मफेअरने जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं.
साठ वर्षांच्या कारकीर्दीत ७१ चित्रपट आणि ९ दूरदर्शन मालिकांना त्यांनी संगीत दिलं आहे. चित्रपटांशिवाय खय्याम यांच्या अल्बम साँगलाही श्रोत्यांची तुफान पसंती मिळाली. यात 'पाव पडू तोरे श्याम', 'लोट चलो' आणि 'गजब किया तेरे वादे पे ऐतबार किया'सारख्या गाण्यांचा समावेश आहे.
भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताची पक्की बैठक असलेले संगीतकार खय्याम यांचा सामाजिक कार्यातदेखील मोलाचा वाटा होता.अनेक गरजू कलावंतांसाठी खय्याम यांनी मदतीचा हात पुढे केला. एवढंच नाही तर आपल्या नव्वदाव्या वाढदिवशी त्यांनी केपीजे संस्थेला १२ कोटींची रक्कम मदत म्हणून दिली होती.