मुंबई -हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री वर्षा उसगांवकर ( Varsha Usgaonkar Birthday Special ) यांचा आज वाढदिवस आहे. 'ईटीव्ही भारत'कडून वर्षा उसगांवकर ( Varsha Usgaonkar ) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्ताने वर्षा उसगावकरांच्या जीवन प्रवासाविषयी जाणून घेऊया...
वर्षा उसगावकर यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1968 ला ही गोव्यातील उसगाव येथे झाला. उसगावचे म्हणून उसगावकर. वर्षा उसगावकर यांनी आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका केल्या आहेत. 1990 च्या दशकात त्या मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होत्या.
घरी राजकारणाचे वातावरण
वर्षा उसगावकर यांना उषा, तोषा आणि मनीषा या तीन बहिणी आहेत. गोवा केंद्रशासित प्रदेश असताना त्यांचे वडील ए .के .एस उसगावकर सभापती होते. त्यांनी गोवा सरकारमध्ये मंत्री म्हणूनही काम केले आहे. घरातील राजकीय वातावरण असतानाही, वर्षाला लहानपणापासून चित्रपटसृष्टीची आवड होती. उसगावकरांच्या नातेवाईकांचाही चित्रपटसृष्टीशी दूरचा संबंध नव्हता. तिच्या आजोबांना अभिनेता व्हायचे होते. त्यांची इच्छा अपूर्ण राहिली. वर्षाची आई तिला नेहमी सांगायची की तू आजोबांची इच्छा पूर्ण करत आहेस.
ब्रम्हचारीतून केले पदार्पण
वर्षा उसगावकरांचे शालेय शिक्षण पणजी येथील डेम्पो उच्च माध्यमिक विद्यालयात झाले. त्यानंतर तिने गोवा विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले. वर्षा उसगावकर यांनी 1982 मध्ये मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय "ब्रह्मचारी" या नाटकातून पदार्पण केले. नंतर उसगावकर 'गंमत जम्मत', 'हमाल दे धमाल', 'सगळीकडे बोंबाबोंब', 'सावत माझी लाडकी', 'शेजारी शेजारी', 'एक होता विदूषक', 'लपंडाव', 'अफलातून' या चित्रपटात आपले अस्तित्व सिध्द केले.