मुंबई - प्रसिध्द बॉलिवूड उर्मिला मातोंडकर आज आपला ४८ वा वाढदिवस साजरा करीत आहे. तिचा जन्म 4 फेब्रुवारी 1974 रोजी श्रीकांत आणि सुनीता मातोंडकर यांच्या घरी झाला. या अभिनेत्रीला पडद्यावर उत्सफुर्त परफॉर्मन्स देण्यासाठी ओळखले जाते. 4 वर्षांच्या ब्रेकनंतर 2018 च्या 'ब्लॅकमेल' या चित्रपटात ही अभिनेत्री शेवटची रुपेरी पडद्यावर दिसली होती. तिने 2016 मध्ये मोहसीन अख्तर या काश्मिरी बिझनेसमन आणि मॉडेलशी लग्न केले होते.
बालकलाकार ते आघाडीची अभिनेत्री होण्याचा प्रवास
उर्मिला मातोंडकरने 1977 मध्ये बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने 1980 मध्ये ‘झाकोळ’ नावाच्या मराठी चित्रपटात छोटी भूमिका केली आणि त्याच वर्षी ‘कलयुग’ या ड्रामा चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
तिने पुढील काही वर्षांत अनेक मराठी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यानंतर शेखर कपूरच्या 'मासूम' या चित्रपटात तिने काम केले. या चित्रपटातील भूमिकेमुळे तिला समीक्षकांकडून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यावेळी ती नऊ वर्षांची होती.
उर्मिलाने ‘नरसिंहा’ चित्रपटातून आघाडीची अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. त्यानंतर ती शाहरुख खानसोबत 1989 मध्ये गाजलेल्या 'चमत्कार' या काल्पनिक चित्रपटात दिसली. तिला येत्या काही वर्षांत महत्त्वाच्या भूमिका मिळत राहिल्या आणि सुपरस्टार कमल हासनसोबत ‘चाणक्य’ या ब्लॉकबस्टर मल्याळम चित्रपटात भूमिका मिलाली. तिने दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यासोबत चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणावर काम केले जे बहुतेक थ्रिलर होते.
रंगीलामुळे कारकिर्दीच्या शिखरावर
तिने 1995 मध्ये 'रंगीला' मध्ये सुपरस्टार आमिर खानसोबत काम केले आणि चित्रपटाच्या यशाने तिची कारकीर्द नवीन उंचीवर पोहोचली. या चित्रपटाने तिला सर्वांच्या केंद्रस्थानी आणले आणि तिने आगामी काही वर्षांत बॉलिवूडची आघाडीची महिला म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली.