मुंबई- दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बॉलिवूड पदार्पणाचा बहुप्रतीक्षित 'झुंड' चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला. जिगरबाज तरुणांची फौज, त्यांचा राडा आणि त्यांच्यातील उर्जेला नवी वाट करुन देणारा फुटबॉलचा मैदानी खेळ याचा जबरदस्त मेळ 'झुंड'च्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. अमिताभ बच्चन साकारत असलेली व्यक्तीरेखा लाजवाब तर आहेच पण त्यांनी तरुणाईला दिलेली प्रेरणा चित्रपटाचा प्राण असणार आहे. ट्रेलरमुळे आता या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
नागराज मंजुळे यांचा 'झुंड' चित्रपट हा फुटबॉलपटू विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. अमिताभ बच्चन त्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन हे एकत्र आल्यामुळे आता या चित्रपटाची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बडी 'फिल्म बडे पडदे पे' असे कॅप्शन या चित्रपटाला साजेसे वाटत आहे.