मुंबई- अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी यांच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला होता. ट्रेलरला प्रेक्षकांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला होता. पण आता या चित्रपटाविषयी मोठी बातमी समोर येत आहे. अशी बातमी आहे की, निर्मात्यांनी 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटाचे नाव बदलून 'लक्ष्मी' केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक राघव लॉरेन्स आज सेन्सॉर प्रमाणपत्रसाठी गेले होते. यावेळी सीबीएफसीशी झालेल्या चर्चेनंतर प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेऊन चित्रपटाचे निर्माते शबीना खान, तुषार कपूर आणि अक्षय कुमार यांनी 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटाचे शीर्षक 'लक्ष्मी' करण्याचा निर्णय घेतला आहे.
या बातमीनंतर अक्षय कुमार आणि कियारा अडवाणीचा हा चित्रपट आता 'लक्ष्मी' या नावाने ओळखला जाईल. चित्रपटाचा प्रीमिअर 9 नोव्हेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार व्हीआयपीवर होईल. या वृत्ताला चाहत्यांनीही बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वीही अनेक संघटनांनी चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी केली होती.