मुंबई- कसे असेल नवीन वर्ष? प्रत्येकालाच नवीन वर्ष कसे जाईल हे जाणून घेण्यासाठी उत्सुकता असते आणि याला फिल्मस्टार्स देखील अपवाद नाहीत. परंतु बरेच स्टार्स आपल्या चित्रपटाच्या शूट्सची, प्रदर्शनाची आधीपासूनच आखणी करीत असतात म्हणून फिल्म कलाकारांना भवितव्याबद्दल निश्चिन्तता असते. अर्थातच चित्रपट चालवणे अथवा न चालवणे हे सर्वकाही मायबाप प्रेक्षकांच्या हाती असते. आणि त्यामुळेच कलाकार आपल्या कामात १००% देत असतात. आपल्या कामात १००% किंवा थोडेसे जास्तच टाकणारा कलाकार म्हणजे टायगर श्रॉफ. तरुणाईचा आणि खासकरून लहान मुलांचा आवडता अभिनेता टायगर आपला अभिनय, ॲक्शन आणि नृत्य यावर जास्त फोकस करीत असतो. या वर्षात त्याचे दोन ‘बिग तिकीट’ चित्रपट येऊ घातले आहेत.
बॉलिवूड तारे त्यांचे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सणासुदीच्या हंगामाची वाट पाहत असतात आणि प्रेक्षक देखील पॉवर-पॅक्ड मनोरंजन करणाऱ्या चित्रपटाकडे लक्ष ठेवून असतात. याकाळात संपूर्ण कुटुंब आणि मित्रमंडळी एकत्र येऊन चित्रपटाचा आनंद लुटतात. सणासुदीचा मोसम बहुतेक मोठ्या स्टार्सनी बुक केला असतो आणि यावेळी टायगर श्रॉफनेही सणासुदीचा हंगाम आपल्या नावावर बुक केला आहे. याचे कारण म्हणजे त्याचे चित्रपट 'हिरोपंती २’ आणि 'गणपथ' या वर्षी शूटिंग पूर्ण करणार आहेत. टायगरच्या या दोन चित्रपटांबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली असून प्रेक्षक, खासकरून त्याचे फॅन्स, त्याच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पहात आहेत.
टायगरचे चाहते नेहमीच त्याच्या कधीही न पाहिलेल्या ॲक्शन सीक्वेन्स आणि अप्रतिम डान्स मूव्ह्सची वाट पाहत असतात. आगामी काळात टायगरकडे आणखी ३ चित्रपट आहेत ज्यावर तो काम करत आहे. तसेच, २०२२ च्या सणासुदीच्या हंगामासाठी दोन मोठे चित्रपट हातात असणार्या फिल्म इंडस्ट्रीमधील इतर तरुण अभिनेत्यांपैकी तो कदाचित एकमेव आहे असे दिसते.