मुंबई -जगभरात वेगाने पसरणारा कोरोना विषाणू भारतात येऊन ठेपला आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. कोरोनामुळे उद्योगधंद्यांवरही परिणाम दिसू लागले आहेत. तसेच, बॉक्स ऑफिसलाही याचा चांगलाच फटका बसला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील काही मुख्य शहरांमधील चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जीम, जलतरण तलाव इत्यांदी ठिकाणे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रासोबतच तेलंगना सरकारनेही सिनेमागृह बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अलिकडेच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईवर याचा परिणाम दिसत आहे.
अभिनेता इरफान खानचा 'अंग्रेजी मीडियम' हा चित्रपट १३ मार्चला प्रदर्शित झाला. मात्र, पहिल्याच दिवशी या चित्रपटाची कमाई फक्त ४.०३ कोटी इतकी झाली आहे. या चित्रपटातून इरफान खान बऱयाच वर्षानंतर पडद्यावर झळकला आहे. मात्र, काही ठिकाणी चित्रपट गृह बंद असल्याने या चित्रपटाला फटका बसला आहे.