नवी दिल्ली - लाल किल्ला हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी दीप सिद्धूचा मंगळवारी मृत्यू झाल्याने (Accidental Death of Deep Sidhu ) खटल्याच्या सुनावणीवर कोणताही परिणाम होणार नाही. कायद्याच्या तज्ज्ञांच्या मते, हिंसाचाराच्या या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर आरोपींवर खटला सुरूच राहणार आहे. त्याचवेळी सिद्धू यांच्या मृत्यूबाबत ( Deep Sidhu Death ) न्यायालयाला माहिती दिली जाणार आहे. त्याचे मृत्यू प्रमाणपत्र सादर केले जाईल. त्यानंतर त्याच्यावरील खटला थांबेल. परंतु इतर आरोपींवर खटला सुरूच राहील.
मिळालेल्या माहितीनुसार 26 जानेवारी 2021 रोजी लाल किल्ल्यावर शेतकरी आंदोलनाशी संबंधित काही लोकांनी हिंसाचार केला होता. यामध्ये 400 हून अधिक पोलीस जखमी झाले. याबाबत दोन एफआयआर दाखल करण्यात आले होते. यातील एक लाल किल्ल्यावरील हिंसाचाराचा होता जो एसएचओच्या जबानीवर नोंदवण्यात आला होता.
त्याच वेळी भारतीय पुरातत्व विभागाच्या तक्रारीसंदर्भात दुसरी एफआयआर नोंदवण्यात आली. पंजाबी अभिनेता दीप सिद्धूला लाल किल्ला हिंसाचार प्रकरणात मुख्य आरोपी बनवण्यात आले होते. दीप सिद्धू यांनी लाल किल्ल्यावरून फेसबुक लाईव्ह केले. त्याच्यावर लोकांना भडकावल्याचा आरोप होता. त्याच्या अटकेवर एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. स्पेशल सेलने त्याला 8 फेब्रुवारी 2020 रोजी कर्नाल येथून अटक करून गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले होते.