महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बाल तस्करीच्या रहस्यमय जगात डोकावणारा 'बॅकवॉटर्स'! - बाल तस्करी चित्रपट बॅकवॉटर्स

आपल्याकडे दरवर्षी शेकडो मुले बेपत्ता होतात. त्यातील काहींचा शोध लागतो तर काहींचा लागत नाही. बेपत्ता झालेल्या मुलांचे काय होते, ते कुठे जातात हा कायम संशोधनाचा विषय राहिला आहे. याच आशयावर आधारित एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Backwaters Movie
बॅकवॉटर्स चित्रपट

By

Published : Apr 30, 2021, 11:05 AM IST

मुंबई - ‘सनशाईन स्टुडिओ’ केरळमध्ये बेपत्ता झालेल्या लहान मुलाची रहस्यमय कथा 'बॅकवॉटर्स' चित्रपटातून माध्यमातून प्रेक्षकांसाठी आणत आहे. अंकित चंदिरामणी यांचे 'सनशाईन स्टुडिओज' वितरण क्षेत्रात कायमच आघाडीवर राहिले आहे. ही संस्था आता चित्रपटनिर्मितीत उतरली आहे. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध चित्रपटांचे वितरक म्हणून आणि तब्बल ७०हून अधिक मराठी चित्रपटांचे वितरक आणि प्रस्तुतकर्ते म्हणून त्यांनी सिनेसृष्टीत आपले नाव कमावलेले आहे.

'सनशाईन स्टुडिओ' यांचे 'सुनिल जैन प्रॉडक्शन' (एसजेपी) आणि आशिष अर्जुन गायकर यांचे (एजीएफएस) यांनी बाल तस्करी आणि हरवलेल्या मुलांच्या रहस्यमय जगात डोकावणाऱ्या ‘बॅकवॉटर्स’ या आशयघन आणि रहस्यमय चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक एफटीआयआयचे पदवीधर अभिनव ठाकूर आहेत. यात दिल्ली थिएटर अभिनेता सरताझ खरे हा सीबीआय अधिकाऱ्याच्या भूमिकेत असणार आहे तर, ब्रिटिश मॉडेल नीता परानी ही एकाच वेळी अनेक तथ्यांच्या शोधात असणाऱ्या पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

२००५ मध्ये केरळमधून बेपत्ता झालेल्या राहुल राजू या सात वर्षीय मुलाचा अद्याप शोध लागलेला नाही. राहुल कुठे आहे हा प्रश्न आजही त्याच्या पालकांना सतावत आहे. राहुल प्रमाणे कित्येक मुले बेपत्ता झाली असतील. त्यांचा शोध कशाप्रकारे घेतला जाईल यावर आधारित हा चित्रपट आहे. अपहरणासारख्या गंभीर विषयात डोकावणे आणि अशा जिवंत घटना लोकांसमोर आणणे ही या चित्रपटाची प्राथमिकता आहे. 'सनशाईन स्टुडिओ' ही वितरक कंपनी तब्बल ३०० हून अधिक चित्रपटांचा अनुभव गाठीशी बाळगून आहे. ‘बॅकवॉटर्स’ हा चित्रपट वर्षाच्या अखेरीस केरळमधील आळेपुळा येथे चित्रित करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details