मुंबई - बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर त्याने वैद्यकीय उपचारासाठी कामातून ब्रेक घेत असल्याचे सोशल मीडियावरुन सांगितले होते.
संजय दत्तच्या जवळपास अर्धा डझन चित्रपटांची रांग आहे. यातील बर्याच चित्रपटांचे शूटिंग किंवा डबिंगचे काम शिल्लक आहे. अलीकडील लॉकडाऊनमुळे याला उशिर झालाय. सजय दत्त बरा व्हावा यासाठी चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या असल्या तरी त्याला पडद्यावर पाहण्यासाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. संजय दत्तच्या आगामी चित्रपटांकडे एक नजर टाकूयात :
सडक -२
सडक -२ या चित्रपटाचा ट्रेलर अलिकडेच रिलीज झाला होता. या ट्रेलरला लोकांनी इतके नाकारले की, हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा आणि भारतातील पहिल्या क्रमांकाचा सर्वाधिक नापसंत केलेला व्हिडिओ ठरला आहे. दिग्दर्शक महेश भट्ट यांना सोशल मीडियावर भरपूर ट्रेल करण्यात आले. परंतु, संजय दत्तचे चाहते त्याच्याशी निष्ठावंत आहेत. त्यांनी संजूबाबाकडे दिलगीरी व्यक्त केली आहे.
महेश भट्ट दिग्दर्शित या चित्रपटात त्यांच्या दोन्ही मुली पूजा आणि आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. तथापि, चित्रपटासाठी आता डबिंगचे थोडे काम बाकी आहे, जे वैद्यकीय उपचारासाठी ब्रेक घेण्यापूर्वी दत्तने संपवण्याची योजना केली आहे. हा चित्रपट येत्या 28 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
समशेरा
समशेरा चित्रपटात संजय दत्त महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. परंतु, या चित्रपटाचे शूटिंग अद्याप झालेले नाही. संजय दत्तला रुग्णालयातून डिस्चार्ज देताना डॉक्टरांनी बेड रेस्टचा सल्ला दिलाय. त्यामुळे या चित्रपटाचे शूटिंग तो लवकर सुरू करू शकणार नाही.
चित्रपटाच्या निर्मात्यांना आता संजय दत्तची तब्येत सुधार होईपर्यंत थांबावे लागेल असे दिसते. करण मल्होत्रा दिग्दर्शित ‘यशराज फिल्म्स’ निर्मित या पीरियड ड्रामामध्ये रणबीर कपूर आणि वाणी कपूर देखील आहेत.
भूज : द प्राईड ऑफ इंडिया
सडक २ प्रमाणेच ओटीटी वर रिलीज होणाऱ्या पीरियड ड्रामामध्ये संजय दत्त महत्वाची भूमिका साकारत असून अजय देवगण सह-कलाकार आहे. १९७१ च्या भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या भूज: प्राइड ऑफ इंडिया चित्रपटात भारतीय हवाई दलाचे वैमानिक विजय कर्णिक आणि गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील माधापार गावातील ३०० स्त्रियांची गोष्ट मांडण्यात आली आहे, ज्यांनी भारताला युद्धात विजय मिळविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
शूटिंगचा थोडासा भाग बाकी आहे, जो लवकरच आटोपला जाण्याची शक्यता आहे. अभिषेक दुधैया दिग्दर्शित या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, नोरा फतेही आणि शरद केळकर यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
के.जी.एफ: अध्याय २
कन्नड स्टार यश याच्या २०१८ मध्ये ब्लॉकबस्टर ठरलेल्या "के.जी.एफ: अध्याय 1" च्या सीक्वलमध्ये संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारत आहे. सुरुवातीला हा चित्रपट यावर्षी ऑक्टोबरमध्ये रिलीज होण्याची अपेक्षा होती. पण कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे त्याला उशीर झाला आहे. शूट आणि डबिंगचा थोडासा भाग अद्याप दत्त यांच्यासोबत बाकी आहे.
जरी हा सिक्वेल मूळ कन्नडमध्ये बनविला असला, तरी पहिल्या भागांप्रमाणेच हिंदी, तेलगू, तामिळ आणि मल्याळम भाषेतही डब केला जाणे अपेक्षित आहे. प्रशांत नील दिग्दर्शित या पीरियड ड्रामामध्ये श्रीनिधी शेट्टी, रवीना टंडन, अनंत नाग आदी कलाकार आहेत.
पृथ्वीराज
यशराज फिल्म्स प्रॉडक्शनच्या या चित्रपटामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. मिस वर्ल्ड २०१७ आणि बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी मानुषी छिल्लर संयोगिताची भूमिका साकारत आहेत आणि हा चित्रपट राजा पृथ्वीराज आणि संयोगिता यांच्यातील ऐतिहासिक प्रेम कहणीवर आधारित आहेत. वृत्तानुसार चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शन करीत असलेल्या या चित्रपटाचे शूट अद्याप पूर्ण झालेले नाही. यातही संजय दत्तची महत्त्वाची भूमिका आहे.
तुरबाज
ओटीटी रिलीज होणाऱ्या या आगामी चित्रपटात संजय दत्त लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. गिरीश मलिक यांच्या दिग्दर्शनात नरगिस फाखरी आणि राहुल देव यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
संजय दत्त यांच्यावर मुंबईत उपचार सुरू झाले आहेत. संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात जाताना संजय आणि त्याची बहिण प्रिया दत्त यांना हौशी फोटोग्राफर्सनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले होते.