मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आजकाल तिच्या घराच्या मेकओव्हरमुळे चर्चेत होती. तिने नुकतेच तिचे घर दुरुस्त केले. आता अभिनेत्री स्वराने गृहप्रवेश केला आहे. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. स्वराने सोशल मीडियावर चाहत्यांना नवीन घरातील पुजेचे फोटो शेअर केले आहेत.
स्वराने तिच्या इन्स्टाग्रामवर गृहप्रवेश आणि पूजा विधीचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना स्वराने लिहिले, 'देवांनी मान्यता दिली आहे ...' स्वराने हॅशटॅगसह गृहप्रवेश असे लिहिले आहे. आता अभिनेत्रीच्या नवीन घराबद्दलच्या भरपूर प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. गायिका हर्षदीप कौर आणि अभिनेत्री रुचिका कपूर यांनी स्वराचे तिच्या होम एंट्रीबद्दल अभिनंदन केले आहे.
एका फोटोत स्वरा तिच्या डोक्यावर पूजेचा कलश धरुन उभी असल्याचे दिसते यावेळी तिच्या चेहऱ्यावर खोडकर भाव आहेत. आपल्या घराचा एक फोटो शेअर करुन तिने पूर्वी लिहिले होते, ''सुमारे अडीच वर्षांनंतर मी माझ्या जुन्या घरात पुन्हा नव्याने परत आले आहे. फेब्रुवारी 2019 नंतर माझ्या घरातील ही पहिली रात्र आहे आणि मला खूप आनंदी वाटत आहे. आपल्या सर्वांचे आयुष्य कोविडमध्ये बदलले आहे. आपण खूप काही गमावले आहे, पण अजूनही बरेच काही आहे ज्यासाठी आपण कृतज्ञ असले पाहिजे.''