मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्याने आत्महत्या केल्याचा अहवाल यापूर्वीच महाराष्ट्र पोलिसांनी दिला आहे. मात्र या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेल्याने अद्यापही त्यांनी मृत्यूचे कारण दिलेले नाही. त्यामुळे त्याचा मृत्यू हा आत्महत्या केल्यामुळे झालाय की हत्या होती असा सवाल आजही विचारला जातो.
आज त्याच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याचे स्मरण केले. त्याच्या मित्रांनी हा मर्डर असल्याचे सांगत यासाठी आंदोलन करणार असल्याचे सांगितले. सुशांतचा जिम पार्टनर सुनील शुक्ला यांनी यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढणार असल्याचे स्पष्ट केले.
१४ जून रोजी सुशांत सिंह त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये दोन गट निर्माण झाले. सुशांतची आत्महत्या नसून ती हत्या असल्याचा आरोप केला गेला. मुंबई पोलिसांकडून हा तपास सीबीआयकडे देण्यात आला. त्यानंतर वर्ष उलटूनही या तपासाला विराम देण्यात आलेला नाही. या प्रकरणामध्ये ड्रगचा मुद्द समोर आल्यानंतर तपासाला वेगळे वळण मिळाले. सुशांतची कथित गर्ल फ्रेंड रिया चक्रवर्ती व तिच्या भावाला या प्रकरणात अटक करण्यात आली. आत्ताही सुशांतचा रुममेट सिध्दार्थ पिठानी याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
सुशांतच्या मृत्यूनंतर एम्सने दिलेल्या अहवालात ही आत्महत्या असल्याचे म्हटले होते. मात्र सीबीआयने अद्यापही याबाबतचा निर्णय गुलदस्त्यातच ठेवलाय.
हेही वाचा - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : सुशांतचा स्वयंपाकी नीरजची सीबीआय चौकशी सुरू