मुंबई - केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी सांगितले की, सुशांतसिंह राजपूत प्रकरण बंद करण्याबाबत प्रसार माध्यमांमधील बातम्या खऱ्या नाहीत. या संबंधातील अहवाल निराधार व खोटे आहेत. सुशांत प्रकरणाची चौकशी अद्याप सुरू असल्याचे सीबीआयने स्पष्ट केले.
सीबीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, "सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी सीबीआयने सुरू ठेवली आहे. सीबीआय कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचली नसल्याची मीडियामध्ये अटकळ आहे. हे अहवाल तर्कावर आधारित असून ते खोटे आहेत," असे सीबीआयने एका छोट्या निवेदनात म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून काही मीडियामध्ये असे अहवाल येत आहेत की, सुशांतची केस सीबीआयने संपवली असून क्लोजर रिपोर्ट दाखल केला जाणार आहे.
बिहार सरकारच्या विनंतीवरून सीबीआय दोन महिन्यांहून अधिक काळ या प्रकरणाची चौकशी करत आहे. दिवंगत अभिनेतेचे वडील कृष्ण किशोर सिंह यांच्या वतीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे एजन्सीने एफआयआर दाखल केला होता.
यावर्षी 14 जून रोजी अभिनेता सुशांतसिंह राजपूत त्याच्या वांद्रे येथील घरात मृत अवस्थेत आढळला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि ही आत्महत्या असल्याचे म्हटले. या घटनेनंतर जवळपास दीड महिन्यानंतर पाटणा येथे 25 जुलै रोजी सुशांतच्या वडिलांनी एफआयआर दाखल केला होता. त्यामध्ये सुशांतची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यावर सुशांतच्या मृत्यूस जबाबदार ठरवण्यात आले होते. यानंतर, बिहार सरकारने पुन्हा तपास सीबीआयकडे सोपवण्याची शिफारस केली आणि हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले.
सीबीआय व्यतिरिक्त सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि अमलीपदार्थ नियंत्रण विभागार्फे (एनसीबी) देखील या प्रकरणाचा तपास करत आहेत.