पाटणा - अभिनेता सुशांतसिंह राजपूतचे वडील के. के. सिंह यांनी आपल्या मुलाच्या निधनानंतर काही गोष्टींबद्दल चर्चा केली आहे. यामध्ये त्यांनी सुशांतच्या विवाहाबद्दलही खुलासा केला आहे. सुशांत २०२१ मध्ये विवाह करणार होता, अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली. मात्र, तत्पूर्वी सुशांतने वयाच्या ३४ व्या वर्षी आत्महत्या केली. तो डिप्रेशनच्या आजाराने तो त्रस्त झाला होता, अशी माहिती समोर येत आहे.
सुशांतच्या वडिलांनी एका मुलाखतीत सांगितले की सुशांत लहानपणी प्रत्येक गोष्टीवर मोकळेपणाने बोलायचा. मात्र तो जसजसा मोठा होत गेला तसा तो एकटा स्वतःत मश्गुल राहायला लागला होता. ''सुरुवातीला तो सगळे बोलायचा पण शेवटी काय झाले, ते त्याने नाही सांगितले.'' सुशांतची गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेबद्दल बोलताना ते म्हणाले की, ''मुंबईसह ती पाटण्यातही सर्वांना भेटायला आली होती. सुशांत आणि अंकिताची जोडी 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून हिट झाली होती आणि सहा वर्षे ते एकत्र राहात होते. सुशांतच्या निधनानंतर अंकिता त्याच्या मुंबईतील घरामध्ये जाताना दिसली होती.
सुशांतच्या वडिलांनी खुलासा केला की, २०२१ मध्ये सुशांत लग्न करणार होता. वडिलांच्यादृष्टीने सुशांतच्या जीवनात एकच मुलगी होती ती म्हणजे अंकिता. त्यांना रिया चक्रवर्तीबद्दल काहीच माहिती नव्हते. त्यांनी हेही सांगितले की सुशांत म्हणाला होता तो कृती सेनॉनला भेटला आहे. सुशांतच्या निधनानंतर कृतीने सुशांतबद्दल पोस्ट लिहून खूप कौतुक केले होते.