मुंबईः अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनाबद्दल जे वक्तव्य केलंय ते सिध्द करण्यास अपयश आले तर पद्मश्री पुरस्कार परत करेन असे अभिनेत्री कंगना रनौतने म्हटलंय.
हिंदी चित्रपटसृष्टीत प्रचलित पॉवरप्ले आणि गैरप्रकारांबद्दल कंगना सतत बोलत आली आहे. कंगनाने बॉलिवूडमध्ये असलेल्या नेपोटिझ्मवर नेहमी आपला जोर दिला आहे. यामुळेच सुशांतने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचे तिचे ठाम मत आहे. या सर्व गोष्टींचा उल्लेख करीत पुन्हा एकदा कंगनाने आपण करीत असलेले आरोप निराधार निघाले तर सरकारने दिलेला पद्मश्री पुरस्कार परत करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
एका आघाडीच्या न्यूज चॅनलशी बोलताना कंगना म्हणाली, "मुंबई पोलिसांनी मला बोलवले आणि मीही त्यांना सांगितले की मी मनालीमध्ये आहे. माझा जवाब घेण्यासाठी कोणाला तरी माझ्याकडे पाठवा, परंतु त्यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही. मी तुम्हाला सांगते जर मी असे काही बोलले आहे ज्याचा मी पुरावा देऊ शकणार नाही, जे मी सिध्द करु शकत नाही आणि जे जनतेच्या हिताचे नाही, तर मी माझा पद्मश्री परत करेन. मी त्याच्यासाठी पात्र नाही. अशा प्रकारची विधाने करणारी मी व्यक्ती नाही आणि आतापर्यंत मी जे काही बोलली आहे ते जनतेच्या हिताचे आहे."