मुंबई- सिनेजगतातून एक धक्कादायक व खूपच दु:खद वृत्त समोर आले आहे. टीव्ही ते चित्रपट असा यशस्वी प्रवास करणारा उद्योन्मुख अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुशांतने वांद्रे येथील आपल्या राहत्या घरातील एका खोलीत गळफास घेऊन जीवन संपवले. सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येचे नेमके कारण काय असू शकते, याचा तपास सुरू आहे. सुशांत गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते, अशी माहिती मिळते आहे. तर सुशांतचा मृतदेह महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयात नेण्यात आला आहे.
'या' खोलीत सुशांतने आत्महत्या केली. सुशांत सिंग राजपूतने बॉलिवूडमध्ये अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केले. धोनी द अनटोल्ड स्टोरी हा धोनीचा जीवनपट केल्यानंतर सुशांत चांगलाच चर्चेत आला होता. कायपो छे, धोनी द अनटोल्ड स्टोरी, केदारनाथ, छिछोरे यासारख्या चित्रपटांमध्ये सुशांतने भूमिका साकारल्या.
दरम्यान काही दिवसांपूर्वी सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर राहिलेली दिशा सालियान ने मुंबईतील मालवणी परिसरात एका इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. दिशा सालियान ने मालवणीतील जनकल्याण नगरमधील तिच्या भावी नवऱ्याच्या फ्लॅटमधून उडी मारून जीवन संपवले होते.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या
हेही वाचा -सुशांत सिंग राजपूत आणि वरुण शर्माच्या माजी महिला मॅनेजरची आत्महत्या
सुशांतचा जन्म बिहारच्या पाटण्यात 21 जानेवारी १९८६ झाला. सुशांतने मॅकेनिकल इंजिनियरींगचे शिक्षण पूर्ण केले होते. सुशांत सिंह राजपूतने त्याच्या करीअरची सुरुवात 'किस देश मे है मेरा दिल' या मालिकेतून केली. मात्र, 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून सुशांत घराघरात पोहोचला. ती मालिका अर्ध्यावर सोडून सुशांतने त्याची पावले मोठ्या पडद्याकडे वळवली. सुशांतने 'काय पो चे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने शुद्ध देसी रोमांस, पीके, धोनी द अनटोल्ड स्टोरी, केदारनाथ, सोनचिढीया आणि छिछोरे यासारख्या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या.
पवित्र रिश्ता मालिकेदरम्यान सुशांत आणि त्याची सहकलाकार अंकिता लोखंडे एकमेकांच्या प्रेमात पडले. सुशांत आणि अंकिता सहा वर्षे नात्यात होते. मात्र, त्यानंतर त्यांच्यात खटके उडायला लागले आणि ते वेगळे झाले.
सुशांतला 'काय पो चे' चित्रपटातील पदार्पणासाठी फिल्मफेयर अवार्ड मिळाला होता. तर धोनी द अनटोल्ड स्टोरीसाठी फिल्मफेयरसाठी नामांकित करण्यात आले होते. तसेच भारत सरकारच्या निती आयोगाने वूमन इंटरप्रेन्योरशिप प्लॅटफॉर्मचा प्रसार करण्यासाठी सुशांतची निवड केली होती.
सुशांतने आर. माधवनसोबत चंदा मामा दूर के हा चित्रपट साईन केला होता. तसेच मुकेश छाब्रा यांचा द फॉल्ट इन अवर स्टार या पुस्तकावर आधारीत दिल बेचारा चित्रपट साईन केला होता. यासह इतर काही चित्रपटांमध्ये तो काम करणार होता.