हैदराबाद- शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिने रंगभेदाबद्दल व्यक्त केलेले मत सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. तिच्या या मतावरुन तिला सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आले होते. तिच्यासारख्या तरुण मुलींवर याचा काय परिणाम होऊ शकतो, ही बाब समजून घेण्यासारखी आहे. असे असले तरी तिचा बाप शाहरुख खान मात्र फेअरनेस क्रीमच्या जाहिराती करीत असतो. त्यामुळे सुहानाच्या मताविरुद्धच तो वागतोय यात शंका नाही.
सुहानासाठी ट्रोलिंगचा अनुभव काही नवखा नाही. स्टार किड म्हणून तिच्यावर अनेकवेळा टीका झालेली आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत तिच्या त्वचेच्या रंगावरुन टीका केली जात आहे.
सुहानाने इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टमध्ये तिला 'कुरुप' म्हटल्याचे लिहिले आहे. तिचा रंग गव्हाळ असल्यामुळे ही टीका केली जात आहे. सोशल मीडिया आणि मॅच मेकिंग साईटने ठरवलेल्या सौंदर्याच्या कल्पना आपल्या आयुष्यावर लादल्या जाऊ नयेत, असे तिने म्हटलंय.
सुहानाने आपल्या पोस्टचा शेवट 'एन्ड कलरिजम' या हॅशटॅगने केला आहे. रंगभेदचा शेवट व्हावा, यासाठी तिने जोरदार बॅटिंग केली असली तरी तिचे वडील शाहरुख खान पुरुषांसाठी वापरल्या जाणाऱ्या फेअरनेस क्रीमचा चेहरा आहेत.
ट्रेड रिपोर्टनुसार, एका आघाडीच्या कंपनीने शाहरुखला पुरुषांच्या फेअरनेस क्रीमचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून साईन केले आहे. २००७ पासून तो या कंपनीच्या करारात असून २०१९ मध्ये त्याने २०२१ पर्यंतच्या करारावर सही केली आहे.