मुंबई- हल्लीच्या काळात वाचनाची आवड कमी झाल्यामुळे पुस्तके कमी वाचली आणि विकली जातात. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे हल्लीच्या पिढीला वाचनाची आवड नाहीये, परंतु हेच तंत्रज्ञान वापरून पुस्तके ऐकायला मिळत आहेत. स्टोरीटेलने अनेक ऑडिओ बुक्स बाजारात आणल्या असून ते अनेक सेलिब्रिटीजच्या आवाजात ध्वनिमुद्रित करून मुलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांना साहित्याची आणि कथांची गोडी निर्माण व्हावी हे त्यांचे ध्येय आहे. भारतातील विविध भाषांमधील ऑडिओ बुक्सची मागणी आणि आवड बघता स्टोरीटेलने आता श्रोत्यांसाठी ११ भारतीय भाषांमधील एक विशेष सबस्क्रिप्शन प्लॅन उपलब्ध करून दिला आहे. ‘सिलेक्ट’ असे या प्लॅनचे नाव असून यात आपल्याला ११ स्थानिक भारतीय भाषांमधील ऑडिओ बुक्स ऐकता येणार आहेत.
विविध भाषांमध्ये उपलब्ध
पुस्तकप्रेमी व साहित्यप्रेमी श्रोत्यांना स्टोरीटेलवर दिग्गज लेखकांचे अभिजात साहित्य ऐकायला मिळत आहे. यात ज्येष्ठ लेखकांपासून ते नवोदित लेखकांनी लिहिलेल्या दर्जेदार कादंबऱ्या, कथा, आत्मचरित्रे उपलब्ध आहेत. याआधी फक्त मराठी भाषेसाठी सिलेक्ट प्लॅन उपलब्ध करण्यात आला होता. यात सर्व मराठी ऑडिओ बुक व ईबुकचा समावेश होता. या प्लॅनला विशेष यशही मिळाले. या यशानंतर आता हिंदी, मराठी, उर्दू, बंगाली, तमिळ, मल्याळम, तेलुगू, आसामी, गुजराती, ओडिसी आणि कन्नड या ११ भारतीय भाषांमधील विविध ऑडिओ बुक्स दरमहा १४९/- रूपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
नव्या पिढीतील लेखकांची लोकप्रिय ओरिजिनल ऑडिओ बुक्सही उपलब्ध
पु. ल. देशपांडे, सुहास शिरवळकर, रत्नाकर मतकरी, शिवाजी सावंत, वि. स. खांडेकर, भालचंद्र नेमाडे अशा मराठीतील मान्यवर साहित्यिकांच्या लेखणीतून अजरामर झालेल्या कलाकृती श्रोत्यांना या ‘सिलेक्ट” मध्ये ऐकता येतील. मृत्यूंजय, युगंधर, छावा, निवडक पुलं असे अभिजात साहित्य स्टोरीटेलवर अतिशय लोकप्रिय आहेत. याशिवाय नव्या पिढीतील लेखकांची लोकप्रिय ओरिजिनल ऑडिओ बुक्सही यात ऐकता येतील. ही ऑडिओ बुक्स लोकप्रिय अभिनेते विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, अतुल कुलकर्णी, सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्णी, संदीप खरे, गिरीश कुलकर्णी, किशोर कदम, अतुल पेठे, उदय सबनीस आदि नामवंतांनी वाचली आहेत.