मुंबई- कोरोना काळात अनेक बाधितांचे अनुभव ऐकून बऱ्याच जणांना या आजाराची अधिकच भीती वाटू लागली आहे. त्यातच या महामारीने अनेकांचे जीव घेतले आहेत. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात भीती दडी मारून बसली आहे. कोरोनाची दुसरी लाट तर महाभयंकर असून प्रत्येकजण फक्त या आजारापासून कसे वाचायचे याचाच विचार करताना दिसत आहे. त्यामुळे स्ट्रेस वाढला असून अनेक जण हृदयविकाराचे झटके येऊन मृत्यू पावत आहेत. नुकताच मनोरंजनसृष्टीतील ख्यातनाम ‘स्टील फोटोग्राफर’ सुधाकर मुणगेकर यांचे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरी निधन झाले आहे.
वयाच्या अखेरपर्यंत फोटोग्राफर म्हणून काम
सिने स्थिरछायाचित्रकार अविवाहित सुधाकर मुणगेकर ७३ वर्षांचे होत. अनेक वर्षे ते एकटेच राहत होते. दामोदर कामत स्थापन केलेल्या 'कामत फोटो फ्लॅश' या कंपनीमध्ये १९६६ साली वयाच्या १८ व्या वर्षी ते फोटोग्राफर म्हणून रुजू झाले. ते वयाच्या अखेरपर्यंत फोटोग्राफर म्हणून काम करीत होते. कन्टीन्यूटी फोटोग्राफीमध्ये त्यांचे विशेष प्राविण्य होते. मराठीमध्ये दामू केंकरे दिग्दर्शीत 'सखी माझी', कुमार सोहनी दिग्दर्शित 'जोडीदार', 'तुझ्याचसाठी' अशा अनेक मराठी चित्रपट, नाटक, दूरदर्शन मालिकांसाठी त्यांनी स्थिरचित्रण केले आहे.
दीडशेहून अधिक हिंदी चित्रपटांच्या स्टील फोटोग्राफीचे केले काम