मुंबई - लॉकडाऊननंतर शाहरुख खानने कामाला सुरूवात केल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना मिळाली आहे. त्याच्या जुहू येथील मन्नत बंगल्याच्या बाल्कनीमध्ये तो शूटिंग करताना आढळला आहे. हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
अरबी समुद्राच्या समोर असणाऱ्या मन्नत बंगल्याच्या बाहेर लाईट्स, कॅमेरा आणि अॅक्शनचा उत्सफुर्त थरार चाहत्यांनी अनुभवला आहे. यामध्ये शाहरुख बाल्कनीमध्ये डायलॉग म्हणताना दिसतो. व्हिडिओमध्ये डायलॉग ऐकू येत नसले तरी त्याच्या ओठांच्या हालचालीवरुन तो दमदार डायलॉगबाजी करताना दिसत आहे.
या व्हिडिओत त्याची केशरचनाही चाहत्यांच्या डोळ्यात भरली आहे. तो नेमके कशाचे शूटिंग करीत आहे हे स्पष्ट झालेले नाही. मात्र बऱ्याच मोठ्या अंतरानंतर तो पुन्हा पडद्यावर झळकणार या कल्पनेनेच चाहते सुखावले आहेत.
शाहरुख 'झिरो' या चित्रपटात शेवटचा झळकला होता. हा सिनेमा दोन वर्षापूर्वी २०१८ मध्ये रिलीज झाला होता. कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्माची यात प्रमुख भूमिक होत्या. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकला नव्हता. त्यानंतर दोन वर्षात त्याचा एकही सिनेमा रिलीज झाला नाही. त्यामुळे चाहते चिंतेत आहेत.
अलीकडे, शाहरुख नेटफ्लिक्ससाठी वेब सीरिज तयार करण्यात व्यस्त आहे. त्याने गेल्या वर्षी 'बार्ड ऑफ ब्लड' या हेरगिरी चित्रपटाची निर्मिती केली आणि अलीकडेच 'बेताल' ही मालिकाही समोर आणली. दोन्ही शोसाठी त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.