मुंबई -जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. त्यामुळे अनेक नागरिक होम क्वारंटाइन झाले आहेत. तर जे बेघर आहेत, यांची राहण्याची व्यवस्था नाही, अशा लोकांसाठी क्वारंटाइन केंद्र उभारण्यात आले आहेत. यासाठी बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान याने देखील आपला 4 मजली बंगला क्वारंटाइन केंद्रासाठी मदत म्हणून उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे बीएमसीने शाहरुखचे एका ट्विट च्या माध्यमातून आभार मानले आहेत.
शाहरुखने उपलब्ध करून दिलेल्या या बंगल्यात ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला यांना ठेवण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूला लढा देण्यासाठी कला विश्वातील अनेक कलाकार आर्थिक मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. अशात किंग खानची मदत अनेकांना आधार देणारी ठरली आहे.
काही दिवसांपूर्वीच, शाहरुख खानने पीएम आणि सीएम फंडला मदत, साडेपाच हजार लोकांना जेवण तसेच अडीच हजार लोकांना किराणा पुरवणार असल्याची घोषणा केली होती. आपल्या पोस्टमध्ये शाहरुख खानने लिहिले होते की, त्याची आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाइट रायडर्स पीएम केअर फंडला पैसे देईल. या फ्रँचायझीचे सह मालक जय मेहता आणि जूही चावलादेखील मदत करतील.
शाहरुख खानची आयपीएल फ्रेंचायजी, केकेआर आणि एनजीओ मीर फाउंडेशन आरोग्य सेवा व्यावसायिकांना 50 हजार वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे पुरवणार आहेत.
याव्यतिरिक्त, शाहरुखचे मीर फाउंडेशन एक महिन्यासाठी मुंबईतील सुमारे 5500 कुटुंबांना दररोज भोजन देईल. तसेच स्वयंपाकघरही बांधले जाणार आहे, जिथे दोन हजार कुटुंबे व रुग्णालयांसाठी जेवण बनवले जाईल.